For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ममता मंत्रिमंडळातील मंत्र्याचा राजीनामा

06:10 AM Aug 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
ममता मंत्रिमंडळातील मंत्र्याचा राजीनामा
Advertisement

महिला वनाधिकाऱ्याला धमकी देणे पडले महागात

Advertisement

वृत्तसंस्था/ कोलकाता

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या मंत्रिमंडळातील कॅबिनेट मंत्री अखिल गिरी यांना महिला वन अधिकाऱ्याला धमकावणे महागात पडले. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि तृणमूल काँग्रेसच्या नाराजीनंतर त्यांनी रविवारी मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला.

Advertisement

तृणमूल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुब्रत बक्षी यांनी रविवारी सकाळी अखिल गिरी यांच्याशी फोनवरून संपर्क साधत अपमानित केलेल्या महिलेची माफी मागून पक्षाकडे राजीनामा देण्यास सांगितले होते. यापूर्वी पक्षाच्या सूचनेनुसार माफी मागण्याऐवजी अखिल गिरी यांनी केवळ खंत व्यक्त केली होती. यावर पक्षाचे समाधान झाले नाही. यानंतर त्यांना राजीनामा देण्यास सांगण्यात आले. त्यांनी स्वत: राजीनामा न दिल्यास त्यांना मंत्रिपदावरून बडतर्फ केले जाऊ शकते, असे सांगण्यात आले. मात्र, कारवाईच्या भीतीने त्यांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शवल्याचे बोलले जात आहे.

एका महिला प्रशासकीय अधिकाऱ्याला धमकावल्याचा फटका कॅबिनेट मंत्री अखिल गिरी यांना बसला आहे. पूर्व मिदनापूर जिह्यातील ताजपूर येथे अतिक्रमण काढण्यासाठी कार्यरत असलेल्या टीमचे नेतृत्व या महिला अधिकारी करत होत्या. मनीषा शॉ असे महिला वनअधिकाऱ्याचे नाव सांगितले जात आहे. अतिक्रमणविरोधी कारवाईदरम्यान गिरी यांनी घटनास्थळ गाठून वनविभागाच्या पथकाशी वाद घातला. ‘तुम्ही सरकारी कर्मचारी आहात, माझ्यासमोर बोलताना मान खाली ठेवा, असे ते महिला वनअधिकाऱ्याला सांगताना व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहेत. तसेच ‘तुमची वागणूक सुधारा, नाहीतर... मी तुला काठीने मारेन’ असेही त्यांनी धमकावले होते. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तृणमूल काँग्रेससह सर्व पक्षांनी गिरी यांच्यावर टीका केली आहे.

अखिल गिरी यांच्यावर कठोर कारवाई करून ममता बॅनर्जी यांनी पक्ष आणि प्रशासनाला पक्षाच्या सूचनांचे उल्लंघन खपवून घेतले जाणार नाही, असा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. दुसरीकडे अधिकाऱ्यांनी निर्भयपणे काम करावे, सरकार आणि सत्ताधारी त्यांच्या पाठीशी आहेत, असाही मुख्यमंत्र्यांचा संदेश प्रशासनाला गेला.

एका महिला वन अधिकाऱ्याला शिवीगाळ केल्याप्रकरणी तुऊंगमंत्री अखिल गिरी यांनी संबंधित महिला अधिकाऱ्याची माफी मागावी, असा आदेश तृणमूल काँग्रेसने दिला. या सूचनेनंतर अखिल गिरी यांनी त्यादिवशी घडलेल्या घटनेबद्दल खेद व्यक्त करत या घटनेसाठी वनाधिकाऱ्याला जबाबदार धरल्यामुळे पक्ष संतप्त झाला आणि अखिल गिरी यांना राजीनामा देण्यास सांगितले.

Advertisement
Tags :

.