ब्रिटनचे पंतप्रधान स्टार्मर यांचा पदत्याग
पक्षांतर्गत दबावामुळे निर्णय, जगभरातून प्रतिक्रिया
वृत्तसंस्था / लंडन
ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी पदत्याग केला आहे. तसेच त्यांनी मजूर पक्षाचे प्रमुखपदही सोडले आहे. पक्षांतर्गत दबावामुळे त्यांनी हा निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. मी आजवर प्रत्येक निर्णय देशहिताला प्राधान्य देऊनच घेतलेला असून पदाचा त्यागही याच भावनेतून केला आहे, असे वक्तव्य त्यांनी केले. पदत्याग केलेले ते या दिशाचे गेल्या 10 वर्षांमधील सहावे नेते आहेत.
लंडनमधील ‘10 डाऊनिंग स्ट्रीट’ हे ब्रिटनच्या नेत्यांचे पारंपरिक अधिकृत निवासस्थान आहे. आपल्या पदाचा त्याग करण्यापूर्वी ते त्यांच्या पत्नीसह या निवासस्थानातून बाहेर पडले आणि त्यांनी पदत्यागाची कारणे स्पष्ट केली. साधारणत: 2 वर्षांपूर्वी त्यांनी ब्रिटनची धुरा आपल्या खांद्यांवर घेतली होती. ही दोन वर्षे माझ्या आयुष्यातील सर्वात अभिनाची होती. ब्रिटनच्या कोट्यावधी नागरीकांचे जीवन समृद्ध करण्याचे ध्येय मनात धरुन मी राजकारणात आलो आणि ब्रिटनच्या सर्वोच्च पदापर्यंत पोहचलो. या काळात मला सर्वांचे उत्कट सहकार्य लाभले. आता समाधानाने निवृत्त होत आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
ब्रिटनची प्रगती केल्याचा दावा
आपल्या दोन वर्षांच्या सत्ताकाळात ब्रिटनची सर्वांगिण प्रगती करण्यात आपल्याला यश आले. आर्थिक विकास, वेतनवाढ, गुंतवणूकवृद्धी, पायाभूत सुविधांची वाढ, कामगार आणि भाडोत्री लोक यांच्या अधिकारांमध्ये वाढ, संरक्षण खर्चातील वाढ, बालकांच्या गरीबीत घट, बेरोजगारीतील घट हा माझ्या कामांचा लेखाजोखा आहे. आपल्या धोरणांमुळे ब्रिटन अधिक सुरक्षित आणि अधिक प्रबळ झाला आहे. 5 लाख बालकांना गरीबीतून बाहेर काढण्यात आपण यशस्वी झालो आहोत, असे प्रतिपादन त्यांनी त्यांच्या निरोपाच्या भाषणात देशाला उद्देशून केले.
वादग्रस्ततेतही आघाडीवर
स्टार्मर यांच्या कार्यकाळात ब्रिटनने प्रगती केली असली, तरी त्यांचा कार्यकाळ वादग्रस्ततेनेही भरलेला होता. दबावामुळे अनेक धोरणे त्यांना मागे घ्यावी लागली. तसेच त्यांच्या धोरणांना लोकांचा विषेश पाठिंबा न मिळाल्यामुळे त्यांची लोकप्रियताही घसरली. याचा फटका त्यांच्या मजूर पक्षाला बसला, असे तज्ञांचे मत आहे. गेले 5 महिने. त्यांना मोठ्या प्रमाणात पक्षांतर्गत दबावाला तोंड द्यावे लागले.
प्रतिस्पर्ध्याचा उदय
मजूर पक्षातील त्यांचे प्रबळ प्रतिस्पर्धी अँडी बर्नहॅम यांचा सांसदीय निवडणुकीत विजय झाल्यामुळे स्टार्मर यांच्यावर दबाव वाढला होता. बर्नहॅम यांनी निवडून येताच स्टार्मर यांच्या नेतृत्वाला आव्हान देण्यास प्रारंभ केला होता. ब्रिटनच्या कनिष्ठ लोकप्रतिनिधीगृहातील मजूर पक्षाच्या 100 हून अधिक सदस्यांचा पाठिंबा मिळविण्यात बर्नहॅम यशस्वी झाले. त्यानंतर त्यांनी स्टार्मर यांना त्यागपत्र देण्याचे आव्हान जाहीररित्या केले आणि सत्तात्यागाचे वेळापत्रक घोषित करण्याची मागणी केली. पक्षांतर्गत दबाव वाढत असल्याचे पासून स्टार्मर यांनी पदत्याग केला आहे.
बेकायदा स्थलांतर : चिंतेचे कारण
ब्रिटनमध्ये पाकिस्तान, आफ्रिकेतील देश, आशिया खंडातील देश आदींमधून मोठ्या प्रमाणात स्थलांतरीत येत आहेत. या स्थलांतरीतांमध्ये मुस्लीमांचे प्रमाण अधिक आहे. बव्हंशी हे स्थलांतर बेकायदा मार्गाने होत असून त्यामुळे ब्रिटनमधील सार्वजनिक सेवांवर मोठा दबाव येत आहे. तसेच गुन्ह्यांच्या संख्येमध्येही मोठी वाढ झाली आहे, असा आरोप तेथील विरोधी पक्ष करीत आहेत. सर्वसामान्य जनतेमध्येही या बेकायदा स्थलांतरितांसंबंधी नाराजीची भावना आहे. मजूर पक्ष अशा स्थलांतरीतांचा सहानुभूतीदार आहे, असेही मानले जाते. स्टार्मर यांच्या पदत्यागाचे हे महत्वाचे कारण मानले जात आहे. त्यांच्या पदत्यागानंतर अमेरिका, फ्रान्स, जर्मनी, इटली आदी देशांकडून संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.
ब्रिटनमध्ये राजकीय अस्थिरता
ड स्टार्मर यांनी सोमवारी पदत्याग केल्याने ब्रिटनमध्ये पुन्हा नेतृत्वाचा प्रश्न
ड अँडी बर्नहॅम हे कीर स्टार्मर यांच्या स्थानी नेते होण्याची बळावली शक्यता
ड मजूर पक्षाला ब्रिटनच्या लोकसभेत प्रचंड बहुमत असूनही पक्षांतर्गत भेद