लाच घेतल्याचे सिद्ध झाल्यास राजकारण संन्यास
आमदार गणेश गावकर यांचे प्रतिपादन
पणजी : गणेश गावकर या व्यक्तीने कधी कोणाच्या नोकरीसाठी चहा घेतलेला नाही आणि आपण नोकरीसाठी कोणाकडूनही काही घेतले असेल तर कोणीही पुढे यावे. सिद्ध झाल्यास राजकारणच सोडून देईन, असे सावर्डेचे आमदार गणेश गावकर म्हणाले. आपल्या नावाने 2022 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी एक ऑडिओ उघडकीस आणला. जे कोणी हे कारस्थान करीत होते ते व त्यांची कीर्ती जगजाहीर आहे. आपण त्यावर कोणतेही भाष्य करणार नाही. जो कोणी ऑडिओ उघडकीस आणला त्यातील आवाज माझाच आहे हे कोणी सिद्ध करावे? आपण काही असल्या भानगडीत पडत नाही. आपण नोकरी कधी विकली नाही व एवढ्या खालच्या पातळीवर आपण कधीही येणार नाही, असे गावकर म्हणाले. कोणीतरी पोलीस तक्रार केल्याचे आपल्याला समजले. याविरुद्ध कायदेशीर कारवाई करणार आहे. किती कोटींचा दावा करणार हे आज काही सांगत नाही. कधीही कोणाकडूनही आपण कामासाठी वा नोकरीसाठी पैसे घेतलेले नाहीत. आपल्या नावाची बदनामी करण्यासाठीच हे कारस्थान कोणीतरी रचलेले आहे, असे आमदार गणेश गावकर म्हणाले. आपण आता या प्रकरणी कायदेशीर कारवाई करण्यासाठी पावले उचलणार. या संदर्भात आपण काही कायदेतज्ञांकडे चर्चा केल्याचेही आमदार गावकर म्हणाले.