For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कारवार जिल्हावासीय गणेशोत्सवासाठी सज्ज

11:47 AM Sep 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
कारवार जिल्हावासीय गणेशोत्सवासाठी सज्ज
Advertisement

प्रतीक्षा आगमनाची : सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मंडपावर आकर्षक सजावटीसह विद्युत रोषणाई

Advertisement

कारवार : गणेशोत्सवासाठी संपूर्ण कारवार जिल्हा सज्ज झाला आहे. आता केवळ गणरायांच्या आगमनाची प्रतीक्षा लागून राहिली आहे. जिल्ह्यात एका बाजुला सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे मंडप सज्ज झाले आहेत. तर दुसऱ्या बाजुला घरगुती गणरायांच्या आगमनाची उत्कंठा लागून राहिली आहे. जिल्ह्यातील हजारो घरांमध्ये बाप्पाचे स्वागत करण्यासाठी रंगरंगोटी, आकर्षक सजावट आणि विद्युत रोषणाईवर शेवटचा हात फिरविला जात आहे. कारवार तालुक्यातील गणपती समोरील माटोळी वैशिष्ट्यापूर्ण असते. एका बाजुला पुरुष मंडळी आकर्षक माटोळी आकारण्यासाठी झटत आहेत तर गृहिनींना पूजेचे साहित्य बनविण्यासाठी वेळ अपुरा पडत आहे. गणेशोत्सवाच्या आवश्यक साहित्याच्या खरेदीसाठी गेल्या चार-पाच दिवसांपासून भाविक बाजारपेठेत गर्दी करीत आहेत.

सजावटीचे साहित्य फळे, फुले आदींच्या खरेदीमुळे प्रत्येक दिवशी लाखो रुपयांची उलाढाल होत आहे. मूर्तिकारांनी गेल्या दोन महिन्यांपासून श्रींच्या मूर्ती बनविण्याच्या कार्याला वाहून घेतले आहे. बहुतेक मूर्तिकारांनी आपले कार्य पूर्ण केले असून आता त्यांना शनिवारची प्रतीक्षा लागून राहिली आहे. कारवार तालुक्यातील मूर्तिकारांच्या श्रींच्या मूर्तींना गोव्यासह कर्नाटकातील अन्य शहरांतील सार्वजनिक मंडळांकडून मोठी मागणी असते. त्यामुळे गोवा आणि अन्य शहरातील मंडळे, श्रींच्या मूर्ती नेण्याचे चित्र दिसून येत आहे. जशा येथील मूर्ती अन्यत्र नेल्या जातात त्याप्रमाणेच अन्य शहरातूनही येथे श्रींच्या मूर्तींचे आगमन होत आहे. कारवार तालुक्यातील हजारो कुटुंबे नोकरी आणि व्यवसायानिमित्त गोवा, बेंगळूर, बेळगाव, धारवाड, हुबळी, मुंबई, पुणे आदी शहरांमध्ये वास्तव्य करून आहेत. गणेशोत्सवासाठी ही मंडळी आपल्या मूळगावी दाखल होत आहेत. त्यामुळे कारवार तालुक्यातील गावे नागरिकांच्या उपस्थितीने फुलून गेली आहेत.

Advertisement

भाविकांसाठी बसची व्यवस्था 

जिल्ह्यात नोकरी किंवा अन्य कारणासाठी वास्तव्य करून असलेल्या अन्य जिल्ह्यातील गणेशभक्तांना आपल्या गावी ये-जा करण्यासाठी  केएसआरटीसीच्या वेगवेगळ्या डेपोतून खास बस व्यवस्था करण्यात आली आहे. गोव्यातून कारवार तालुक्याकडे येणाऱ्या नागरिकांची संख्या प्रचंड असते. त्याकरिता गोव्यातील कदंबा वाहतूक मंडळाकडून दि. 6 रोजी कारवारपर्यंत खास बसफेऱ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.

Advertisement
Tags :

.