For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

नाल्याच्या अपूर्ण कामामुळे आनंदनगरमधील रहिवासी हैराण

12:28 PM Apr 09, 2026 IST | Tarun Bharat Portal
नाल्याच्या अपूर्ण कामामुळे आनंदनगरमधील रहिवासी हैराण
Advertisement

दुर्गंधीसह विहिरींचे पाणीही झाले दूषित : समस्येकडे दुर्लक्ष झाल्याने नागरिक संतप्त

Advertisement

बेळगाव : आनंदनगर दुसरा क्रॉस वडगाव येथील नाल्याच्या अपूर्ण कामाचा फटका येथील रहिवाशांना मोठ्या प्रमाणात बसू लागला आहे. नाल्याचे काम अपूर्ण राहिल्यामुळे त्यामध्ये मोठ्या प्रमाणात कचरा व पाणी साचले आहे. त्यामुळे परिसरात प्रचंड प्रमाणात दुर्गंधी पसरली असून, आजूबाजूच्या विहिरींचे पाणी दूषित झाले आहे. तरीदेखील महानगरपालिकेकडून दुर्लक्ष होत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

वडगावच्या आनंदनगर परिसरातील नाल्याचे काम मागील काही वर्षांपासून बंद आहे. नाल्याचे काम अर्धवट असल्यामुळे या ठिकाणचे ड्रेनेजचे पाणी विहिरींमध्ये मिसळत आहे. यामुळे विहिरींच्या पाण्याला दुर्गंधी येत असल्याने त्याचा वापर करणेही अवघड होत आहे. त्यातच आठवडाभरापूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे नाल्यात सांडपाणी साचून राहिले आहे. यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला असून साथीचे रोग वाढले आहेत.

Advertisement

मनपाकडून नाला स्वच्छतेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष

पावसामुळे मोठ्या प्रमाणात कचरा व घाण येऊन नाल्यात अडकली आहे. त्यामुळे रहिवाशांना याचा नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. कॉलरा, मलेरिया, डेंग्यू, हिवताप यासारखे आजार डोकेवर काढण्याची शक्यता आहे. मागील अनेक दिवसांपासून या नाल्याच्या स्वच्छतेची मागणी केली जात असतानाही महानगरपालिकेकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे.

धोकादायक नाल्यावर स्लॅब घालण्याची मागणी

आनंदनगर येथील नाला, तिसरा क्रॉस, दुसरा क्रॉस व पहिला क्रॉस अशा लोकवस्तीतून जातो. नाल्यावर बांधकाम नसल्यामुळे नागरिकांसाठी तो धोकादायक ठरत आहे. आजूबाजूला खेळणारे विद्यार्थी या नाल्यात पडल्यास मोठा अनर्थ घडण्याची शक्यताही वर्तविली जात आहे. त्यामुळे महानगरपालिकेने या ठिकाणी तातडीने स्लॅब घालावा, अशी मागणी केली जात आहे.

Advertisement
Tags :

.