आमगावातील रहिवाशांना स्थलांतरित करणार
भेटीप्रसंगी मंत्री ईश्वर खांड्रे यांनी ग्रामस्थांना दिले आश्वासन : स्थलांतर नको फक्त सुविधा पुरविण्याची रहिवाशांची मागणी
वार्ताहर/कणकुंबी
मानव-वन्यजीव संघर्ष नियंत्रित करण्यासाठी आणि वनवासीयांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी, वन, जीवशास्त्र आणि पर्यावरण मंत्री ईश्वर बी. खांड्रे यांनी खानापूर तालुक्यातील जंगलात असलेल्या आमगावमधील रहिवाशांना स्थलांतरित करण्यासाठी पावले उचलली जातील असे आश्वासन दिले आहे. गुरुवारी आमगाव ग्रामस्थांनी मंत्री ईश्वर खांड्रे यांना भेटून स्थलांतराची विनंती केल्यानंतर आमगाव रहिवाशांना संबोधित करताना ते म्हणाले की, मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच, व्याघ्र प्रकल्प नसलेल्या भीमगड अभयारण्यातील तळेवाडी येथील 27 कुटुंबे, ज्यांना स्वेच्छेने जंगलातून बाहेर पडायचे होते. त्यांचे यशस्वीरित्या स्थलांतर करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे आमगाव आणि इतर निवासी क्षेत्रांच्या स्थलांतरासाठी कारवाई केली जाईल. तळेवाडीच्या स्थलांतराबद्दल काही लोक चुकीची माहिती पसरवत आहेत. जंगलात निवासी क्षेत्रांचे स्थलांतर केल्याने वनवासी देखील समाजाच्या मुख्य प्रवाहात येतील. तसेच मानव-वन्यजीव संघर्षही कमी होईल. शिवाय, मानवी हस्तक्षेपाशिवाय वन विकासही होईल.
चुकीची माहिती देणाऱ्या अफवाकडे लक्ष देऊ नका
काही लोक जे विचारतात की त्यांना सर्व पायाभूत सुविधांची आवश्यकता आहे. ते वनवासी कोणत्याही पायाभूत सुविधांशिवाय जंगलातच राहावेत असे इच्छितात. ते सरकारच्या चांगल्या हेतूने आखलेल्या कार्यक्रमांना अनावश्यकपणे अडथळा आणण्यासाठी तक्रारी दाखल करतात. ते वनवासीयांना चुकीची माहिती देतात. अशा कोणत्याही अफवांकडे लक्ष देऊ नका, असे मंत्री ईश्वर खांड्रे यांनी सांगितले.
नागरिकांना स्थलांतरित करण्याऐवजी मूलभूत सुविधा पुरवा
पूर्वांपार जंगलात राहणाऱ्या आमगाव वासियांना जंगलातून बाहेर काढण्याचे षड्यंत्र सुरू असून, यामध्ये स्थानिक नागरिकांचा सहभाग किती व राजकीय नेते मंडळींचा सहभाग किती याबद्दल प्रश्नचिन्ह आहे. स्थानिक नागरिकांना आमगावमधून बाहेर काढून त्यांच्या जमिनी किंवा इतर मिळकत कमी किमतीत लाटण्याचे एक षड्यंत्र काही लोकरचत असल्याने याचा स्थानिक नागरिकांना किती फायदा होणार याचे उत्तर स्पष्ट आहे. शतकानूशतके जंगल विभागातील राहणारे नागरिक निसर्गाशी एकरूप झाले आहेत. त्यांचे मूलभूत प्रश्न सोडवण्याऐवजीं किंवा त्यांना सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याऐवजी त्यांनाच जंगलातून बाहेर काढणे आणि आपण श्रेय लाटणे असे कृत्य काही मंडळींकडून होत आहे.
वास्तविक जंगलात राहणाऱ्या लोकांकडूनच जंगलाचे रक्षण होते तसेच त्यांचे जीवनमान जंगलाशी म्हणजे निसर्गाशी एकरूप झाले आहे. असे असताना त्यांना मूलभूत गरजा पुरवण्याऐवजी गावाचे स्थलांतर करायचे हा कुठला न्याय आहे. स्थानिक नागरिकांची अन्य कोणतीही मागणी नाही. फक्त मुख्य रस्त्यापासून आपल्या गावापर्यंत ये-जा करण्यासाठी पक्क्या स्वरूपाचा रस्ता, बस वाहतूक, लाईट, आरोग्य आणि शिक्षण एवढ्या सरकारने सोयी केल्या तर स्थानिक नागरिकांना हलवण्याचा प्रश्नच येत नाही. असे असताना केवळ खोटे नाटे सांगून आमगाव सारख्या शेकडो वर्षांपासून अस्तित्वात असलेल्या गावातून त्यांना बाहेर काढण्याचे षड्यंत्र चालू आहे. अशी चर्चा नागरिक व जांबोटी, कणकुंबी भागांमध्ये सुरू आहे.
वनमंत्र्यांना निवेदन एक षड्यंत्र
वास्तविक गुरुवारी कर्नाटकाचे वनमंत्री ईश्वर खंड्रे यांना आमगाव वासियांनी स्थलांतरासाठी निवेदन दिले आहे असे भासविण्यात आले आहे. परंतु त्यामध्ये स्थानिक नागरिक किती आहे हा मोठा अनुत्तरीय प्रश्न आहे. आमगाव नागरिकांच्या अनुपस्थित केवळ दोन-चार नागरिकांना हाताशी धरून हे कृत्य करणारे काही महाभाग सध्या चर्चेत असून, नागरिकांना स्थलांतरित करण्याऐवजी त्यांनाच मुलभूत सुविधा पुरवा, अशी मागणी जांबोटी, कणकुंबी भागातील नागरिकांमधून होत आहे.