चव्हाट गल्लीत ड्रेनेजमिश्रित पाणीपुरवठ्यामुळे रहिवासी संतप्त
शुद्ध पाणीपुरवठा न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा : नळांना तब्बल आठ ते 15 दिवसांतून पाणीपुरवठा
बेळगाव : चव्हाट गल्लीतील घरगुती नळांना गेल्या काही दिवसांपासून ड्रेनेजमिश्रित पाणी येत आहे. त्यामुळे लहान मुलांना उलटी, जुलाब सुरू झाल्याने गल्लीतील रहिवासी व महिला आक्रमक बनल्या आहेत. लोकप्रतिनिधी व अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षपणाचा निषेध करत मंगळवारी महिलांनी गल्लीत रिकाम्या घागरी घेऊन आंदोलन केले. तातडीने सदर समस्या न सोडविल्यास भविष्यात तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.
एलअॅण्डटी कंपनीकडून चव्हाट गल्लीत 24 तास पाणी योजनेसाठी पाईपलाईन घालून घरोघरी नळकनेक्शन देण्यात आले आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून नळांना तब्बल आठ ते 15 दिवसांतून एकदा पाणी सोडले जात आहे. त्यातच ड्रेनेजमिश्रित पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. सदर पाण्यामुळे अल्पवयीन मुलांना उलटी, जुलाब सुरू झाला आहे. वयोवृद्धांच्या आरोग्याचा प्रश्नही निर्माण झाला आहे.
याबाबत गल्लीतील महिलांनी महापालिका आयुक्तांशी फोनवर संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. लहान मुलांना उलटी, जुलाब सुरू झाला असल्याने काही दुर्घटना घडल्यास या जबाबदार कोण? असा सवाल उपस्थित करण्यात आला. नगरसेवक सोहेल संगोळ्ळी यांच्याशी संपर्क साधला असता तेही उपलब्ध होत नाहीत. पाणी नसताना बिल भरून घेण्यासाठी मात्र कर्मचारी वेळेत येतात. एलअॅण्डटी नको पूर्वीचीच पाणी योजना बरी होती, असे मतही यावेळी व्यक्त करण्यात आले.
पाण्याची समस्या लक्षात घेऊन आमदारांनी गल्लीत कूपनलिकेची खोदाई केली आहे. मात्र त्याला अद्यापही वीजजोडणी करण्यात आलेली नाही. 8 ते 15 दिवसांतून एकदा पाणी सोडले जात आहे. तेही ड्रेनेजमिशित असल्याने ऐन उन्हाळ्यात पाणी समस्या निर्माण झाली आहे. पाण्यातून किडे येत आहेत. सरकारकडून मंजूर होणारा निधी कोठे जात आहे? ड्रेनेजमिश्रित पाणीपुरवठा तातडीने थांबवून शुद्ध पाणी किमान चार दिवसांतून एकदा सोडण्यात यावे. अन्यथा भविष्यात तीव्र आंदोलन हाती घेतले जाईल, असा इशारा यावेळी महिला मंडळाच्या अध्यक्षा अक्काताई सुतार यांनी दिला.