टिळकवाडीतील रहिवाशाला सायबर गुन्हेगारांनी 26 लाखांना गंडविले
ऑनलाईन ट्रेडिंगमधील नफ्याचे आमिष
बेळगाव : ऑनलाईन ट्रेडिंगच्या नावाने सावजांना ठकविण्याचे प्रकार सुरूच आहेत. टिळकवाडी येथील एका रहिवाशाला सायबर गुन्हेगारांनी 26 लाख 51 हजार रुपयांना गंडविल्याची माहिती उपलब्ध झाली असून यासंबंधी सायबर क्राईम विभागात एफआयआर दाखल केला आहे. रॉय रोड टिळकवाडीतील संतोष नामक एका गृहस्थाने सायबर क्राईम विभागात फिर्याद दिली आहे. अज्ञातांविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. 10 फेब्रुवारी 2025 ते 4 नोव्हेंबर 2025 यावेळेत टप्प्याटप्प्याने गुन्हेगारांनी त्यांना गंडविले असून एकूण 26 लाख 81 हजार रुपयांना ठकविले आहे.
अज्ञाताने वेल्थ इंटिलिजन्स स्वाईप ग्रुप या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये त्यांना समाविष्ट केले. त्यानंतर व्हॉट्सअॅपवर व टेलिग्रामवर ऑनलाईन ट्रेडिंगबद्दल माहिती पाठविण्यात आली. खाते उघडण्याचे सांगून त्यांच्याच अॅप्लिकेशनमध्ये गुन्हेगारांनी खातेही उघडले. बोगस ट्रेडिंग अॅप्लिकेशनमध्ये मोठी रकमही जमा करून घेण्यात आली. नफा तर नाहीच, गुंतवलेले पैसेही मिळाले नाहीत म्हणून आपण फसलो गेलो, हे त्यांच्या लक्षात आले. मंगळवारी 6 जानेवारी रोजी संतोष यांनी सायबर क्राईम विभागात अज्ञाताविरुद्ध फिर्याद दिली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत. सातत्याने जनजागृती करूनही फसवणुकीचे प्रकार सुरूच आहेत.