15 मेपूर्वी मंत्रिमंडळ पुनर्रचना करा!
दिल्लीत ठाण मांडलेल्या काँग्रेसच्या ज्येष्ठ आमदारांची वरिष्ठांकडे मागणी
प्रतिनिधी/ बेंगळूर
मंत्रिपदासाठी दिल्लीत ठाण मांडलेल्या काँग्रेसमधील ज्येष्ठ आमदारांनी 15 मेपूर्वी मंत्रिमंडळाची पुनर्रचना करावी, असा आग्रह धरला आहे. या आमदारांनी सोमवारी सायंकाळी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेऊन मागण्या मांडल्या आहेत. लवकरच ते वरिष्ठ नेते राहुल गांधी यांचीही भेट घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात कुतूहल निर्माण झाले आहे.
विधानसभेतील सत्ताधारी पक्षाचे मुख्य प्रतोद अशोक पट्टण आणि कर्नाटक सरकारचे दिल्लीतील प्रतिनिधी टी. बी. जयचंद्र यांच्या नेतृत्वाखाली दिल्ली दौऱ्यावर गेलेल्या 20 हून अधिक आमदारांनी सोमवारी सायंकाळी एआयसीसीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेऊन चर्चा केली. हायकमांडने यापूर्वी राज्य सरकारला अडीच वर्षे पूर्ण झाल्यानंतर मंत्रिमंडळ पुनर्रचना करण्याचा शब्द दिला होता. त्यानुसार मंत्रिमंडळाची पुनर्रचना केली जावी, अशी मागणी आमदारांनी पक्षाध्यक्ष खर्गे यांच्याकडे केली आहे.
लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची भेट घेण्यासाठी 16 एप्रिलपर्यंत नवी दिल्लीतच ठाण मांडण्याचा निर्णय या आमदारांनी घेतला आहे. राहुल गांधी हे मंगळवारी पश्चिम बंगालमधील निवडणूक प्रचारसभेत सहभागी होणार आहेत. त्यामळे आमदारांची मंगळवारी राहुल गांधीशी भेट होण्याची शक्यता नाही. आमदारांनी एआयसीसीचे मुख्य सचिव के. सी. वेणूगोपाल आणि राज्य काँग्रेस प्रभारी रणदीप सुरजेवाला यांच्या भेटीसाठी वेळ मागितला आहे. मंगळवारी विश्रांती घेऊन बुधवारी या नेत्यांची भेट घेण्यासाठी प्रयत्न केला जाईल, असे आमदारांनी सांगितले आहे.
निष्क्रिय मंत्र्यांना काढून टाकण्याची मागणी
पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेण्यापूर्वी आमदारांनी दिल्लीतील काँग्रेस भवनमध्ये स्वाक्षरी जमा केल्या. कर्नाटकातील राज्य सरकारला मे महिन्यात तीन वर्षे पूर्ण होणार आहेत. अडीच वर्षांनंतर विद्यमान मंत्र्यांना वगळून नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचे आश्वासन हायकमांडने दिले होते. मंत्रिमंडळातील अनेक मंत्री निष्क्रिय आहेत. त्यांच्याकडून पक्षसंघटनेसाठीही लाभ होत नाही. अशांना मंत्रिमंडळातून काढून टाकावे. तीन-चार वेळा आमदार बनलेल्यांना संधी द्यावी, अशी मागणी आमदारांनी केली आहे.