डिसेंबर अखेर गोव्याच्या मंत्रिमंडळात खांदेपालट
दोन नव्या मंत्र्यांचा होणार समावेश
पणजी : लोकसभा सभापती ओमप्रकाश बिर्ला यांच्या कन्येच्या विवाहासाठी दिल्लीला गेलेले मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि सभापती रमेश तवडकर गोव्यात परतले. परतण्यापूर्वी त्यांनी राज्यसभा खासदार सदानंद शेट तानावडे यांच्यासमवेत महाराष्ट्राचे संभाव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन महाराष्ट्रातील निवडणुकीमध्ये घवघवीत यश संपादन केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. दरम्यान, पुढील महिन्याच्या अखेरच्या टप्प्यात गोवा मंत्रिमंडळात खांदेपालट तसेच दोन नव्या मंत्र्यांचा समावेश केला जाणार आहे. नवी दिल्लीला गेलेल्या मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी अनेक केंद्रीय मंत्र्यांच्या भेटी घेऊन गोव्यातील विकासकामासंदर्भात त्यांच्याशी चर्चा केली. सभापती ओमप्रकाश बिर्ला यांच्या कन्येला आशीर्वाद देऊन आले. बिर्ला यांनी देशातील सर्व खासदारांना तसेच राज्यातील मुख्यमंत्री आणि राज्यातील सभापतींना लग्नाचे निमंत्रण दिले होते. गोव्याचे सभापती रमेश तवडकर हे देखील यानिमित्ताने दिल्लीत गेले होते.
दिल्लीत देवेंद्र फडणवीसांची घेतली भेट
दिल्ली भेटीत मुख्यमंत्र्यांनी पक्षश्रेष्ठींची भेट घेतली नाही. कारण संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला प्रारंभ झालेला होता. त्यामुळे सर्व केंद्रीय नेते हे अधिवेशनात तसेच महाराष्ट्रातील सरकार स्थापनेसंदर्भात चर्चा करुन निर्णय घेण्याच्या गडबडीत होते. मात्र गोव्यात परतण्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी नवी दिल्लीत आलेल्या देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आणि त्यांना शुभेच्छा दिल्या. सभापती रमेश तवडकर आणि प्रदेश भाजप अध्यक्ष सदानंद शेट तानावडे हे देखील यावेळी उपस्थित होते.
पुढील महिन्यात दोन नवे मंत्री शक्य
दरम्यान, गेले कित्येक महिने चालू असलेल्या आणि प्रतीक्षेत असलेल्या गोवा मंत्रिमंडळातील दोन मंत्र्यांना बाजूला हटवून दोन नव्या मंत्र्यांचा त्यात समावेश केला जाणार आहे. मात्र डिसेंबरच्या अखेरीस हा निर्णय घेतला जाणार आहे. पक्षश्रेष्ठींनी सर्व मंत्र्यांच्या कामगिरीचा आढावा घेण्याचे ठरविले आहे. लवकरच पक्षश्रेष्ठींतर्फे एका अधिकाऱ्याला गोव्यात पाठविले जाईल. ते मुख्यमंत्री आणि प्रदेश भाजप अध्यक्षांबरोबर चर्चा करतील असा अंदाज आहे.