रिझर्व्ह बँकेचा कर्जधारकांना दिलासा
रेपो दरात पाव टक्का कपात, ईएमआय कमी होणार
वृत्तसंस्था / मुंबई
रिझर्व्ह बँकेने सलग दुसऱ्यांदा रेपो दरात पाव टक्का कपात करून कर्जधारकांना दिलासा दिला आहे. या निर्णयामुळे गृहकर्ज, वाहनकर्ज आणि व्यक्तिगत कर्जांचे मासिक हप्ते (ईएमआय) कमी होणार आहेत. तसेच जे नवे कर्ज काढू इच्छित आहेत, त्यांना सध्यापेक्षा कमी व्याजदरांमध्ये कर्ज मिळू शकणार आहे.
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ज्या व्याजदराने इतर बँकांना उसनी रक्कम देते, या व्याजदराला रेपो दर असे म्हणतात. हा रेपो दर कमी केल्याने इतर बँकांजवळ अधिक रक्कम उरते. त्यामुळे या बँकांकडे कर्ज देण्यासाठी रकमेचा तुटवडा रहात नाही. त्यामुळे या बँका लोकांनी मोठ्या प्रमाणात कर्जांची उचल करावी, म्हणून कर्जांवरील व्याजदर कमी करतात. तसेच ज्यांनी पूर्वीच कर्जे घेतली आहेत, त्यांच्या कर्जफेडीचे मासिक हप्तेही काही प्रमाणात कमी होतात. यामुळे अर्थव्यवस्थेला अधिक गती प्राप्त होते. लोकांकडून होणाऱ्या खरेदीचे प्रमाणही वाढते.
आता रेपो दर 6 टक्के
रिझर्व्ह बँकेच्या मागच्या पतधोरण बैठकीनंतर रेपो दरात पाव टक्का कपात करण्यात आली होती. त्यानंतर हा दर 6.25 टक्के इतका झाला होता. आता आणखी एकदा पाव टक्का कपात करण्यात आल्याने हा दर 6 टक्के झाला आहे. कोरोना उद्रेकाच्या काळापासूनची ही दुसरी रेपो दर कपात आहे. मे 2020 पासून एप्रिल 2022 पर्यंत रिझर्व्ह बँकेने रेपो दर 4 टक्के या पातळीवर ठेवला होता. त्यानंतर मात्र, या दरात टप्प्याटप्प्याने 6.5 टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आली. हा 6.5 टक्के दर दोन वर्षे स्थिर होता. त्यानंतर त्यात कपात करण्यात आली आहे.
इतर बँकांही अनुकरण करणार
रिझर्व्ह बँकेने रेपो दरात कपात करुन इतर बँकांना जो लाभ मिळवून दिलेला आहे, तो इतर बँका सर्वसामान्य कर्जधारकांपर्यंत त्वरित पोहचवतील, अशी शक्यता आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांमध्ये इतर बँकाही कर्जांवरील व्याजदार कपात करणार आहेत, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे.
कर्जधारकांचा लाभ कसा होणार...
एखाद्या व्यक्तीने घरासाठी विशिष्ट बँकेकडून 50 लाख रुपयांचे कर्ज 30 वर्षे कालावधीसाठी वार्षिक 8.70 टक्के व्याजदराने घेतले असेल, तर त्याला सध्याच्या व्याजदरानुसार त्याला प्रत्येक महिन्याला 39 हजार 157 रुपयांचा हप्ता बसतो. जर त्याच्या बँकेने आता व्याजदरात कपात करुन तो 8.45 टक्के केला तर या कर्जधारकाच्या मासिक हप्त्यात 888 रुपयांची कपात होईल. याचा अर्थ असा की या कर्जधारकाचे महिन्याला 888 रुपये वाचतील. समजा, त्याच्या बँकेने व्याजदरात अर्धा टक्का कपात केली तर या कर्जधारकाचे महिन्याला 1 हजार 769 रुपये वाचतील. याचाच अर्थ असा की या कर्जधारकाचे वर्षाला 10 हजार 500 ते 21 हजार रुपये वाचतील. ज्यांची दीर्घ कालावधीसाठीची कर्जे आहेत, त्यांच्यासाठी ही व्याजदर कपात विशेषत्वाने लाभदायक ठरणार आहे, असे तज्ञांचे मत आहे. अशाच प्रकारे वाहन कर्जधारक आणि व्यक्तिगत कर्जधारक यांचेही पैसे त्या त्या व्याजदरानुसार त्या त्या प्रमाणात वाचणार आहेत. हा सर्वसामान्यांना दिलासा आहे.
व्याजदर कपात कशासाठी...
रिझर्व्ह बँकेने सलग दोन वर्षे रेपो दर 6.5 टक्के या उच्च पातळीवर ठेवला होता. वित्तबाजारात मोठ्या प्रमाणात रोख रकमेचा सुळसुळाट होऊ नये आणि महागाई वाढू नये. म्हणून व्याजदर चढे ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तथापि, आता बाजारात मागणी वाढविण्याची आवश्यकता आहे. मागणी वाढण्यासाठी लोकांच्या हाती अधिक पैसे असण्याची आवश्यकता आहे. त्यामुळेच सलग दोनवेळा रेपो दरात कपात करण्याचे पाऊल उचलण्यात आले आहे.