रिझर्व्ह बँकेचा सुवर्ण साठा 8.80 लाख किलो पार
मुंबई : भारतीय रिझर्व्ह बँकेने गेल्या सहा महिन्यामध्ये एप्रिल ते सप्टेंबर या कालावधीत एकंदर 880.17 मेट्रिक टन इतका सोन्याचा साठा केला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. 2025-26 च्या पहिल्या सहा महिन्यांमध्ये वरील सोन्याचा साठा झाला असून आर्थिक वर्ष 2025-26 च्या कालावधीत 879.58 मेट्रीक टन इतका सोन्याचा साठा होता. 26 सप्टेंबरपर्यंत सोन्याची एकूण किंमत 95 अब्ज डॉलर (8.4 लाख कोटी रुपये) इतकी होती. सप्टेंबरपर्यंतच्या सहा महिन्यांमध्ये रिझर्व्ह बँकेने आपल्या सोने साठ्यामध्ये जवळपास 600 किलो सोने जमा केले आहे. जगभरामध्ये अनिश्चिततेच्या कारणास्तव सोन्याची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. जगभरातील देश आणि त्यांच्या बँका तसेच गुंतवणूकदार सुरक्षिततेसाठी म्हणून सोने खरेदी करत असतात. मागणी आणि खरेदी या दोहोमध्ये वाढ झाल्याकारणाने सोन्याच्या किमती जागतिक स्तरासोबतच देशांतर्गत पातळीवरही वाढलेल्या दिसून आल्या. जगभरातील केंद्रीय बँकांनी याच दरम्यान 166 टन सोन्याचा साठा केल्याचे रिझर्व्ह बँकेने निदर्शनास आणले आहे.
वर्षभरात सोने 47 हजाराने महागले
यावर्षी सोने जवळपास 47 हजार 745 रुपये वाढले आहे. 31 डिसेंबर 2024 रोजी 24 कॅरेट सोन्याचा (10ग्रॅम) दर 76,162 रुपये इतका होता. जो सध्या 1 लाख 23 हजार 907 रुपयांवर पोहोचला आहे.