जिल्हा पंचायत मतदारसंघांची राखीवता 7 रोजी होणार जाहीर
पणजी : जिल्हा पंचायत मतदारसंघाचे आरक्षण येत्या 7 नोव्हेंबरपर्यंत अंतिम करण्यात येणार असून ते निवडणूक कार्यक्रमासोबतच्या अधिसूचनेतून जाहीर करण्यात येणार आहे. मतदारयादीची उजळणी चालू असली तरी जि. पं. च्या 13 डिसेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीत मतदानात कोणताही बदल होणार नाही, असे आयोगाने स्पष्ट केले आहे. राज्य निवडणूक आयुक्त मिनिनो डिसोझा यांनी दिलेल्या माहितीनुसार उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा अशा दोन्ही जिल्ह्यातील प्रत्येकी 25 मिळून एकूण 50 मतदारसंघाची पुनर्रचना पूर्ण झाली आहे.
आता एससी, एसटी, ओबीसी, महिला यांच्यासाठी मतदारसंघ राखीव ठरवण्याची प्रक्रिया आयोग लवकरच सुरू करणार असून ती 7 नोव्हेंबरपर्यंत अधिसूचनेतून जाहीर केली जाणार आहे. मतदारयादी उजळणीचे निर्देश गोवा राज्यासाठीही देण्यात आले असून ती 4 नोव्हेंबरपासून सुरू करण्यात येणार आहे. राज्य निवडणूक आयोगाचा काही कर्मचारीवर्ग उजळणी कामासाठी घेण्यात आल्यामुळे आयोगाला उणीव भासत असून त्यांना दोन्ही निवडणूक आयोगाची कामे करणे भाग पडले आहे. परिणामी त्यांच्यावर अतिरिक्त बोजा पडला असून असे असले तरी जि. पं. निवडणूक पुढे ढकलता येणार नाही. तशी सूचना केंद्रीय निवडणूक आयोगाने केली तरी ते शक्य होणार नाही. त्यामुळे जि. पं. निवडणूक 13 डिसेंबर रोजी ठरल्याप्रमाणेच होणार आहे.