बेळगावसह तीन तालुक्यातील ग्राम पंचायतींचे आरक्षण जाहीर
खानापूर, रायबाग तालुक्मयात इच्छुकांचे राजकीय गणित कोलमडले : वर्षभरापासून तयारी करणाऱ्यांचा हिरमोड
प्रतिनिधी/ बेळगाव
गावच्या राजकारणाचे केंद्र व मिनी विधानसौध म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ग्राम पंचायतींवर सत्ता मिळविण्यासाठी इच्छुकांमध्ये नेहमीच मोठी चढाओढ असते. गावातील राजकीय वर्चस्व प्रस्थापित करण्याबरोबरच स्थानिक राजकारणात आपले स्थान भक्कम करण्यासाठी अनेक जण वर्षभरापासून निवडणुकीच्या तयारीला लागलेले असतात. मात्र जिल्ह्यातील बेळगाव, खानापूर आणि रायबाग या तीन तालुक्मयांतील ग्राम पंचायतींचे आरक्षण जाहीर होताच अनेक इच्छुकांच्या महत्त्वाकांक्षांना धक्का बसला असून निवडणुकीसाठी गुडघ्याला बाशिंग बांधून तयारी करत असलेल्यांच्या स्वप्नांवर पाणी फिरले आहे.
ग्राम पंचायतीवर सत्ता मिळविणे म्हणजे गावातील राजकीय ताकद वाढविण्याची मोठी संधी मानली जाते. याच कारणामुळे निवडणुकीची अधिकृत घोषणा होण्यापूर्वीच अनेक इच्छुकांनी आपापल्या पातळीवर तयारी सुरू केली होती. मतदारांशी संपर्क वाढविणे, गावातील सार्वजनिक कार्यक्रमांना उपस्थित राहणे, सामाजिक उपक्रमांत सहभाग घेणे व समर्थकांची फळी मजबूत करणे, अशा माध्यमांतून त्यांनी आपली राजकीय जमवाजमव सुरू ठेवली होती.
काही इच्छुकांनी तर वर्षभरापासूनच निवडणुकीची तयारी सुरू केली होती. गावातील विविध प्रश्नांवर पुढाकार घेणे, नागरिकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करणे व स्थानिक पातळीवर आपली प्रतिमा निर्माण करणे, यावर त्यांनी भर दिला होता. ग्राम पंचायत निवडणुका या कोणत्याही पक्षाच्या चिन्हावर होत नसतात. मात्र विविध पक्षातील कार्यकर्ते गावातील गट (पॅनेल) तयार करून निवडणुकीला सामारे जात असतात. आरक्षण जाहीर झाल्यामुळे नव्या राजकीय समीकरणांची जुळवाजुळव करावी लागणार आहे.
बेळगाव, खानापूर आणि रायबाग या तीन तालुक्मयांतील ग्राम पंचायतींचे आरक्षण जाहीर झाल्याने कोणत्या प्रवर्गासाठी कोणती जागा राखीव झाली, याची माहिती घेण्याची लगबग इच्छुकांमध्ये सुरू झाली आहे. आपल्याला अनुकूल आरक्षण मिळेल, या अपेक्षेने निवडणुकीच्या मैदानात उतरण्याची तयारी केलेल्या अनेकांना आता नव्याने विचार करावा लागणार आहे. आरक्षण प्रतिकूल ठरल्यास निवडणुकीतून माघार घेणे, पर्यायी उमेदवाराचा शोध घेणे किंवा कुटुंबातील सदस्याला निवडणुकीच्या रिंगणात उतरविणे, अशा पर्यायांचा विचार काही इच्छुकांकडून केला जाण्याची शक्मयता आहे.
ग्राम पंचायतींचे आरक्षण जाहीर झाल्याने इच्छुकांच्या राजकीय तयारीला नवे वळण मिळाले आहे. काहींच्या निवडणूक लढविण्याच्या आशा धूसर झाल्या असताना, काहींसाठी राजकीय संधीचे दरवाजे उघडले आहेत. आता आरक्षणाच्या चौकटीत कोण उमेदवारीसाठी पुढे येणार, कोणाला माघार घ्यावी लागणार व ग्राम पंचायतींच्या सत्तेच्या चाव्या कोणाच्या हाती जाणार, याकडे ग्रामीण भागातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
