For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

उद्योगांच्या विस्तारासाठी जागेची आवश्यकता

06:30 AM Aug 01, 2026 IST | Tarun Bharat Portal
उद्योगांच्या विस्तारासाठी जागेची आवश्यकता
Advertisement

चेंबर ऑफ कॉमर्सचे नूतन अध्यक्ष स्वप्नील शाह : सरकार दरबारी प्रयत्न सुरू

Advertisement

► त. भा. प्रतिनिधी

बेळगाव

Advertisement

बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रिजच्या नूतन पदाधिकाऱ्यांची निवड नुकतीच करण्यात आली. चेंबरच्या अध्यक्षपदी उद्योजक स्वप्नील शाह यांची  निवड झाली असून, बेळगावमधील उद्योजक, व्यापारी यांना भेडसावणाऱ्या समस्यांविषयी ‘तरुण भारत’ने त्यांच्याशी चर्चा केली. तसेच भविष्यात नवे उपक्रम राबविण्यासाठी त्यांच्याकडून होणारे प्रयत्न याविषयीही जाणून घेतले.

► कोणत्या समस्यांवर भर देणार?

- उद्योग अथवा व्यापाराचा विस्तार करणाऱ्यांची संख्या अधिक आहे. परंतु त्यामानाने विजेची उपलब्धता नाही. व्यापाऱ्यांना सुरळीत वीजपुरवठा होत नसल्याने त्यांचे व्यवसाय अडचणीत आहेत. सध्या असलेल्या ट्रान्स्फॉर्मरवर ओव्हरलोड असल्याने ऑगस्ट महिन्यात हेस्कॉमच्या व्यवस्थापकीय संचालक (एमडी) सोबत व्यापक बैठक घेऊन त्यांच्यासमोर विजेच्या समस्या मांडल्या जाणार आहेत.

► कणगला व कित्तूर औद्योगिक वसाहती किती फायद्याच्या?

-राज्य सरकारने उद्योगांच्या विस्तारासाठी कणगला व कित्तूर येथे औद्योगिक वसाहती स्थापन केल्या. यापैकी कणगला येथे सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या असल्या तरी बेळगाव शहरापासून कणगला औद्योगिक वसाहत 57 कि. मी. असल्याने त्या ठिकाणी बेळगावमधील उद्योग सुरू करणे शक्य होणार नाही. तसेच कुशल कामगार त्या ठिकाणी उपलब्ध नसल्याने येथून कामगार तिथंपर्यंत नेणे उद्योजकाला परवडणारे नाही. त्यामुळे बेळगाव तालुक्यातच जागा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे.

► उद्योगांचे स्थलांतर थांबविण्यासाठी काय करणार?

-उद्योगांच्या विस्तारासाठी उद्यमबाग, मच्छे, अनगोळ, मजगाव या परिसरात जागा नसल्याने काही उद्योग खासगी जागांमध्ये राष्ट्रीय महामार्गानजीक जात आहेत. यासाठी सरकारी जागा तर हवीच, त्याचबरोबर रोड कनेक्टीव्हीटीही तितकीच महत्त्वाची आहे. हलगा-मच्छे बायपास रस्त्याचे काम वेळेत पूर्ण झाल्यास काही समस्या सुटणार आहेत. याबरोबरच उद्यमबाग परिसरात नवीन विद्युत स्टेशन व्हावे यासाठीही प्रयत्न केले जाणार आहेत. जर उद्योग बाहेर जात राहिले तर भविष्यात रोजगाराचा प्रश्न निर्माण होणार आहे.

► केंद्र व राज्य सरकारकडे कसा पाठपुरावा करणार?

- उद्योजक व व्यापाऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी लोकप्रतिनिधी व सरकारी अधिकाऱ्यांच्या समन्वयातूनच प्रयत्न होणार आहेत. राज्य सरकारकडे पाठपुरावा करण्यासाठी आमदार, पालकमंत्री यांच्या माध्यमातून मागण्या मांडल्या जात आहेत. तर विमानतळ, रेल्वे यासह इतर पायाभूत सुविधांसाठी खासदार व केंद्रीय मंत्र्यांकडेही पत्रव्यवहार केला जाणार आहे. याबरोबरच उद्योगांना तातडीने परवानग्या मिळाव्यात, यासंदर्भात जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन व जिल्हा उद्योग केंद्र (डीआयसी) उपसंचालक सत्यनारायण भट्ट यांच्यासोबत सततची चर्चा सुरू आहे.

► चेंबरमध्ये निवड कशी होते? अन् सदस्य किती?

-बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज ही उद्योजक व व्यापाऱ्यांसाठी काम करणारी संस्था आहे. चेंबरमध्ये व्यापार व उद्योग या क्षेत्रांचे एकूण 26 सदस्य आहेत. यापैकी दरवर्षी एक तृतीयांश सदस्यांचे सदस्यत्व संपून पुन्हा नव्याने निवडणुका होतात. मॅनेजमेंट कमिटी सदस्यांना तीन वर्षांचा कालावधी मिळतो. ही निवड चेंबर ऑफ कॉमर्सच्या सदस्यांच्या निवडणुकीतून केली जाते.

चौकट करणे

देसूर येथील जागा मिळविण्यासाठी प्रयत्नशील

बेळगाव शहर व तालुक्यातील उद्योजकांमध्ये आपल्या उद्योगांचा विस्तार करण्याची क्षमता आहे. परंतु त्यांना योग्य दरात जागा उपलब्ध होत नसल्याने विस्तार थांबला आहे. उद्योग वाढले तर रोजगाराचाही प्रश्न सुटणार आहे. त्यामुळे देसूर येथील सरकारी जागा मिळविण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. यापूर्वीही यासाठी प्रयत्न झाले असून, लवकरच ती जागा उद्योगांना मिळण्याची शक्यता आहे.

Advertisement
Tags :

.