बांगलादेशात हस्तक्षेपाची ट्रम्पना विनंती
अमेरिकेतील हिंदू, बौद्ध, ख्रिश्चन बांगलादेशींचे संयुक्त निवेदन
वृत्तसंस्था / वॉशिंग्टन
बांगलादेशात अल्पसंख्याकांवर अत्याचार करण्यात येत असून अमेरिकेचे भावी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तेथील अल्पसंख्याकांच्या संरक्षणासाठी तेथील प्रशासनावर दबाव आणावा, अशी विनंती अमेरिकेतील बांगलादेशी हिंदू, बौद्ध आणि ख्रिश्चन लोकांनी संयुक्तरित्या केली आहे. ट्रम्प यांनी बांगलादेशात हस्तक्षेप करावा आणि अल्पसंख्याकांच्या संरक्षणासाठी तेथील सरकारला भाग पाडावे. अन्यथा त्या देशाला धडा शिकवावा, असे निवेदन या नागरिकांच्या संघटनांनी त्यांना दिले आहे.
बांगलादेशच्या नेत्या शेख हसीना यांच्या सरकारच्या पतनानंतर बांगलादेशात हिंदू. ख्रिश्चन आणि इतर अल्पसंख्याकांवर तेथील इस्लामी धर्मवाद्यांकडून अत्याचार होत आहेत. त्यांची घरे आणि प्रार्थनास्थळे जाळली जात आहेत. अल्पसंख्य समुदायातील महिला सुरक्षित नाहीत. बळजबरीने धर्मांतराचे प्रयत्न होत आहेत. अनेक हत्याही झाल्या आहेत. अशा स्थितीत त्यांना एका भक्कम आधाराची आवश्यकता असून ट्रम्प यांनी ही भूमिका पार पाडावी, अशी विनंती करण्यात आली आहे. अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या प्रचार काळात ट्रम्प यांनी बांगलादेशातील अल्पसंख्याकांचे संरक्षण झालेच पाहिजे, अशी भूमिका घेतली होती. बांगलादेशातील सध्याची परिस्थिती भयावह आहे. तेथे अल्पसंख्याकांवर अत्याचार होत आहेत. हे प्रकार थांबलेच पाहिजेत, असेही ट्रम्प यांनी जाहीररित्या स्पष्ट केले होते. डोनाल्ड ट्रम्प 20 जानेवारीला अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाचे शपथग्रहण करणार असून, त्यानंतर ते बांगलादेशसंबंधी कोणता निर्णय घेतात ते समजणार आहे.
संयुक्त निवेदन
अमेरिकेत वास्तव्यास असणारे बांगलादेशी हिंदू, बौद्ध आणि ख्रिश्चन यांच्या संघटनांनी डोनाल्ड ट्रम्प यांना संयुक्त निवेदन सादर केले आहे. बांगलादेशाने आपल्या भूमीवरील अल्पसंख्याकांचे संरक्षण केले नाही, तर त्या देशाच्या आंतरराष्ट्रीय शांतीसेना सहभागावर निर्बंध आणण्यात यावेत. त्या देशावर आर्थिक निर्बंधही लादण्यात यावेत, अशीही मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.
कायद्यांमध्ये परिवर्तन आवश्यक
बांगलादेशच्या प्रशासनावर तेथील कायद्यांमध्ये परिवर्तन करण्यासाठी दबाव आणण्याची आवश्यकता आहे. कोणत्याही परिस्थितीत अल्पसंख्याकांचे संरक्षण झालेच पाहिजे, अशी तरतूद असणारे कायदे बांगलादेशात निर्माण होण्याची आवश्यकता आहे. नवा ‘अल्पसंख्य संरक्षण कायदा’ करण्यासाठी त्या देशाच्या प्रशासनावर विश्वसमुदायाने दबाव आणावा. ट्रम्प यांच्या नेतृत्वात अमेरिकेने यासंबंधी पुढाकार घ्यावा, अशी मागणीही अमेरिकेतल्या अल्पसंख्य बांगलादेशींनी केली आहे.
चिन्मय दास यांची प्रकृती गंभीर
बांगलादेशातील इस्कॉन या संस्थेचे माजी प्रमुख चिन्मय कृष्ण दास ब्रम्हचारी यांना बांगलादेश प्रशासनाने अन्यायाने अटक केली आहे. कारागृहात त्यांची प्रकृती ढासळली असून ते गंभीररित्या आजारी आहेत. त्यांची कारागृहातून सुटका करण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी बांगलादेशच्या प्रशासनावर दबाव आणावा, अशी मागणीही या संयुक्त निवेदनात करण्यात आली आहे. जगभरातील लोकांनी दास यांच्या प्रकृती स्वास्थ्यासाठी प्रार्थना कराव्यात, अशी विनंती करण्यात आली आहे.