विश्वरूप दाखवण्याची विनंती
अध्याय आठवा
सातव्या अध्यायाच्या शेवटी बाप्पांनी राजाला विभूती म्हणजे काय, तसेच त्यांचं महत्त्व व सामर्थ्य इत्यादि गोष्टी समजाऊन सांगितल्या. तसेच हेही सांगितले की, मीच सर्व विश्व व्यापून राहिलो आहे पण माझ्या सामर्थ्याची कल्पना बहुतेकांना अगदी मोठमोठ्या ऋषीमुनी, देवता यांनाही येत नाही आणि ज्यांच्यात माझं सामर्थ्य जाणण्याची कुवत असते त्यांनाच माझ्या सामर्थ्याची कल्पना येते. ते या विश्वात माझं सगुण रूप म्हणून वावरतात व माझ्याप्रमाणे जगाचा उध्दार करायचं कार्य करतात. जगातल्या काही व्यक्ती इतरांच्यापेक्षा निराळ्या असल्याचे दृष्टीस पडते. त्यांना निराळ्या म्हणायचं कारण म्हणजे त्यांच्यात ईश्वराच्या ठिकाणी असलेल्या काही गुणांचे, शक्तीचे अस्तित्व जाणवते. अशा व्यक्तींना, तत्वांना विभूती असे म्हणतात. वरेण्य राजाच्या विभूती म्हणजे काय ते लक्षात आलंय. त्याबद्दल अधिक जाणून घ्यावं म्हणून तो बाप्पांना म्हणतोय,
भगवन्नारदो मह्यं तव नाना विभूतयऽ ।
उक्तवांस्ता अहं वेद न सर्वाऽ सोऽपि वेत्ति ताऽ ।। 1 ।।
अर्थ-वरेण्य म्हणाले, हे भगवंत, नारदांनी मला तुमच्या नाना प्रकारच्या विभूती सांगितल्या तेवढ्या मला माहीत आहेत. तुझ्या त्या सर्व विभूती नारदांना देखील माहीत नाहीत.
विवरण-ईश्वराने सर्व सृष्टी त्याच्या शक्तीच्या मार्फत व्यापली आहे. ईश्वराची सर्व शक्ती तर आपण समजू शकत नाही कारण ती अनंत आहे. तरी पण त्याची चुणूक या विभूतींच्या दर्शनातून आपण अनुभवू शकतो. असा अनुभव घेत असलेला राजा बाप्पांना म्हणतो, बाप्पा तुमच्या अनेक विभूती नारद मुनींनी मला सांगितल्या आहेत पण त्यांनाही सर्व विभूती माहीत नव्हत्या. मला त्या सर्व विभूती समजून घ्यायची उत्सुकता आहे. पुढं राजा बाप्पाना विनंती करतो की, त्वमेव तत्त्वतऽ सर्वा वेत्सि ता द्विरदानन ।
निजं रूपमिदानीं मे व्यापकं चारु दर्शय ।।2।।
अर्थ-हे गजानना, त्या सर्व विभूती तत्त्वत: तुलाच माहीत आहेत. आता मला आपले सुंदर व्यापक रूप दाखव.
विवरण- केवळ भक्तच अशा प्रकारची विनंती करू शकतो. मोठमोठ्या ऋषीमुनींनाही हे शक्य होत नाही पण भक्त ईश्वराच्या इतका जवळ असतो की, जणूकाही तो ईश्वराच्या कुटुंबातील सदस्य झालेला असतो. भगवंतही भागव्तात हे मान्य करतात की, जो माझी अनन्य भक्ती करत असेल त्याला मी माझ्या कुटुंबातील एक मानतो. त्याचे सर्व मनोरथ पुरवण्यास मी उत्सुक असतो कारण मुळातच तो काही मागत नाही. त्यातून त्यानं काही मागितलंच तर मी तत्परतेने त्याची मागणी पुरवतो. खरं तर आपण सर्वही ईश्वराच्या कुटुंबातील सदस्य आहोत पण आपण ईश्वराच्या कुटुंबातील सदस्य आहोत अशी आपल्याला जाणीवच नसते. आपल्या कर्तृत्वावर आपला एव्हढा विश्वास असतो की, स्वत:पुढे आपण ईश्वराला फारशी किंमत देत नसतो. मग ईश्वर तरी आपल्याला त्यांच्या जवळचे का मानतील? जो माझी जशी भक्ती करतो त्याप्रमाणात मी त्याला भजतो असं भगवद्गीतेतही भगवंतांनी सांगितलंय. सामान्य मनुष्य त्याचा प्रत्यय नेहमीच घेत असतो पण वरेण्य राजाचं तसं नाहीये. वरेण्य महाराज बाप्पांचे अनन्य भक्त असल्याने त्यांच्या तोंडून मला तुमचं व्यापक आणि सुंदर रूप दाखवा अशी मागणी आल्याबरोबर त्यांना बाप्पा त्यांचं सर्वव्यापी विश्वरूप दाखवायला तयार होतात. ते म्हणतात,
एकस्मिन्मयि पश्य त्वं विश्वमेतच्चराचरम् ।
नानाश्चर्याणि दिव्यानि पुराऽदृष्टानि केनचित् ।। 3 ।।
अर्थ- श्रीगजानन म्हणाले, एकट्या माझ्यामध्ये तू हे चराचर विश्व अवलोकन कर. पूर्वी कोणी न पाहिलेली नानाप्रकारची दिव्य आश्चर्ये अवलोकन कर.
क्रमश: