कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

महायुती,महाविकास आघाडीची प्रतिष्ठा पणाला !

03:31 PM Jun 13, 2025 IST | Radhika Patil
Advertisement

सांगली / संजय गायकवाड :

Advertisement

सांगली, मिरज व कुपवाड महापालिकेच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून राज्य शासनाच्या आदेशानुसार प्रभागरचना तयार करण्याच्या कामास प्रारंभ झाला आहे. प्रभाग रचनेच्या पाठोपाठ आरक्षण निश्चिती, मतदार याद्यांची प्रसिध्दी व त्यानंतर प्रत्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम घोषित होईल. महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक होऊन आता जवळपास सात वर्षांचा कालावधी होत आला. त्यामुळे आजी, माजी नगरसेवक आणि इच्छुक अशा सर्वांनाच निवडणुकीचे वेध लागले आहेत. महापौर पदाच्या खुर्चीवर आपलाच नगरसेवक बसला पाहिजे व कोणत्याही परिस्थितीत पालिकेवर झेंडा फडकला पाहिजे यासाठी महायुती आणि महाविकासआघाडी अशा दोन्ही बाजूंनी जोरदार प्रयत्न होण्याची शक्यता आहे.

Advertisement

दोन्ही आघाड्यांमध्ये मिळून प्रत्येकी तीन तीन पक्ष आहेत. पण आगामी काही दिवसात सांगलीमध्ये काही मोठ्या राजकीय घडामोडी व पक्षप्रवेश होणार आहेत. जयश्री मदन पाटील यांच्या नजिकच्या काळातील मोठ्या राजकीय निर्णयामुळे पालिकेच्या राजकीय समीकरणाला कलाटणी मिळण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसचे नेते पृथ्वीराज पाटील हे कोणता निर्णय घेणार, पालिकेची निवडणूक महायुती एकत्रित लढणार की स्वबळावर लढणार, महाविकासआघाडी होणार की तिन्ही पक्ष स्वतंत्रपणे लढणार याबाबत पालिका क्षेत्रात उत्सुकता आहे.

मनपाच्या गेल्या २६ वर्षाच्या इतिहासात आतापर्यंत पाच सार्वत्रिक निवडणुका झाल्या. या कालावधीत अपवाद वगळता पालिकेवर कॉंग्रेसचे धडाकेबाज नेते स्वर्गीय मदन पाटील यांच्या गटाचीच सत्ता कायम राहिलेली आहे. एकदा जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी तर मागील पाच वर्षात भारतीय जनता पार्टी अशी दहा वर्षे वगळता इतर वेळी मदन पाटील यांच्या गटाकडेच सता कायम राहिलेली आहे.

मदन पाटील यांनी मागे त्यावेळच्या एकसंघ राष्ट्रवादी प्रवेश केला त्यावेळीही राष्ट्रवादीची सत्ता आली मागील पाच वर्षात सांगली मिरजेतील राजकीय समीकरणे बदलली आहेत. सांगलीमध्ये लोकसभेला विशाल पाटील अपक्ष म्हणून निवडून आले तर विधानसभेला सांगलीतून सुधीर गाडगीळ तर मिरजेतून डॉ. सुरेश खाडे विजयी झाले. राज्यात महायुतीची सत्ता आल्यानंतर पालकमंत्री म्हणून चंद्रकांत पाटील सांगलीची सुत्रे संभाळत आहेत. त्यांच्यावर मोठी जबाबदारी राहणार आहे.

केंद्राबरोबरच राज्यातही सत्ता असलेल्या भाजपा, अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांच्या महायुतीची काही बलस्थाने आहेत. राज्यात सत्ता असल्याने महापालिकेसाठी महायुती ताकद लावणार हे निश्चित आहे. पालकमंत्री म्हणून चंद्रकांत पाटील यांची महायुतीला ताकद मिळणार आहे. शिवाय राष्ट्रवादी अजितदादा पवार पक्षाकडून पालिकेच्या राजकारणाचा गाढा अभ्यास असलेले इद्रिस नायकवडी हे महायुतीबरोबर असतील. सांगली मिरज अशा दोन्ही ठिकाणी भाजपचे आमदार आहेत. जतचे आमदार गोपिचंद पडळकर यांना मानणारा मोठा वर्ग मनपा क्षेत्रात आहे. त्यामुळे महायुतीची सत्ता आणण्यासाठी तेही निवडणुकीत ताकदीने उतरतील अशी चिन्हे आहेत.

दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून जनसुराज्य पक्षाच्या युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांनी मागील काही दिवसात अनेक पक्षातील मोठमोठ्या नेत्यांचे जनसुराज्यची मोठी बांधणी करण्यावर भर दिला आहे. भाजपाचे नेते शेखर इनामदार यांच्याबरोबर त्यांची चांगली मैत्री असल्याने पालिकेवर महायुतीचा झेंडा फडकविण्यामध्ये इनामदार व कदम जोडी ताकद लावू शकते. महायुतीकडे सुधीर गाडगीळ, सुरेश खाडे, दिनकर पाटील, नितीन शिंदे, पृथ्वीराज पवार, मकरंद देशपांडे, नीता केळकर, सुरेश आवटी अशी मोठी नेत्यांची फौज आहे.

महाविकास आघाडीकडे जयंत पाटील, विश्वजीत कदम, विशाल पाटील, पृथ्वीराज पाटील तसेच जयश्री पाटील हे ताकदीचे नेते आहेत. या तिघा नेत्यांना पालिकेची निवडणूक नवीन नाही. पालिकेची सत्ता काबीज करण्यासाठी हे तिघेजण मोठी ताकद लावू शकतात. नजिकच्या काळात जयश्री पाटील यांनी जर कोणता मोठा राजकीय निर्णय घेतला तर त्याचे पालिकेच्या निवडणुकीत त्याचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे. त्यांच्या निर्णयामुळे पालिकेच्या निवडणुकीला कलाटणीही मिळण्याची शक्यता आहे. पालिका क्षेत्रात स्वर्गीय मदन पाटील यांना मानणारा मोठा गट आजही कायम आहे. त्यामुळे जयश्री पाटील यांच्या भविष्यातील राजकीय निर्णयाकडे इच्छुक उमेदवारांबरोबर महायुती आणि महाविकास आघाडीचे नेते लक्ष ठेवून आहेत.

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article