For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

केजरीवाल यांच्याविरोधात याचिका करणाऱ्याला फटकार

06:53 AM Apr 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
केजरीवाल यांच्याविरोधात याचिका करणाऱ्याला फटकार
Advertisement

मुख्यमंत्रिपदावरून हटवण्यासाठी तिसरी याचिका दाखल

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पदावरून हटवण्याची मागणी करणाऱ्या याचिकाकर्त्याला सोमवारी दिल्ली उच्च न्यायालयाने फटकारले. आम आदमी पक्षाचे माजी आमदार संदीप कुमार यांनी दाखल केलेल्या याचिकेच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने कडक शब्दात ताशेरे ओढले. प्रसिद्धीसाठी हे केले जात असल्याचे सांगत आम्ही याचिकाकर्त्याला मोठा दंड ठोठावू, असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे. दिल्ली मद्य धोरणाच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात केजरीवाल यांची कारागृहात रवानगी झाल्यामुळे त्यांना पदावरून हटवण्याच्या मागणीसाठी संदीप कुमार यांनी न्यायालयात धाव घेतली होती. मुख्यमंत्र्यांना पदावरून हटवण्याशी संबंधित असलेली ही तिसरी याचिका आहे.

Advertisement

संदीप कुमार यांच्या याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सुब्रमण्यम प्रसाद यांनी नाराजी व्यक्त केली. तथापि, न्यायालयाने ही याचिका फेटाळली नाही कारण न्यायालयाने याआधीही अशी याचिका खंडपीठाने ऐकली असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. आता सदर याचिकेवर बुधवारी सुनावणी होणार आहे.

यापूर्वी इतरांनी दाखल केलेल्या अशाच दोन याचिका उच्च न्यायालयाने यापूर्वीच फेटाळल्या होत्या. 4 एप्रिल रोजी कार्यवाहक मुख्य न्यायाधीश मनमोहन आणि न्यायमूर्ती मनमीत पीएस अरोरा यांच्या खंडपीठाने या विषयावरील जनहित याचिका विचारात घेण्यास नकार दिला होता. मुख्यमंत्रिपदी राहण्याची केजरीवाल यांची वैयक्तिक इच्छा आहे. तसेच अटक केलेल्या मुख्यमंत्र्यांना पदभार स्वीकारण्यापासून रोखणारे कोणतेही कायदेशीर बंधन सिद्ध करण्यात याचिकाकर्ता अपयशी ठरल्याचे सांगत न्यायालयाने अशीच आणखी एक जनहित याचिका फेटाळली होती.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना 21 मार्च रोजी मद्य धोरण प्रकरणात ईडीने अटक केली होती. त्यानंतर न्यायालयाने त्याला 1 एप्रिलपर्यंत ईडी कोठडी सुनावली. कोठडी संपल्यानंतर न्यायालयाने त्याला 15 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. केजरीवाल सध्या तिहार तुरुंगात आहेत. त्यांच्या अटकेपासून विरोधी पक्ष मुख्यमंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. त्याचवेळी आम आदमी पार्टीने (आप) केजरीवाल मुख्यमंत्रिपदी कायम राहतील, असे स्पष्ट केले आहे.

Advertisement
Tags :

.