आलमट्टीच्या उंचीबाबत कृष्णा खोऱ्यातील प्रतिनिधींची 15 दिवसांत बैठक
जलशक्ती मंत्र्यांचे आश्वासन : उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांची माहिती
प्रतिनिधी/ बेंगळूर
आलमट्टी जलाशयाची उंची वाढविण्यासंबंधी राजपत्रित अधिसूचना जारी करावी, असा प्रस्ताव केंद्र सरकारला सादर केला आहे. केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांनी कृष्णा नदी खोऱ्यातील राज्यांच्या प्रतिनिधींना बोलावून जलाशयाची उंची वाढविण्याच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी पुढील 15 दिवसांत बैठक घेण्याचे आश्वासन दिले आहे, अशी माहिती कर्नाटकाचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी दिली.
नवी दिल्लीतील कर्नाटक भवन-1 मध्ये शुक्रवारी पत्रकार परिषदेत ते बोलत होते. केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांची जलशक्ती खात्याचे राज्य मंत्री व्ही. सोमण्णा यांच्यासमवेत भेट घेतली. महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटकाला कृष्णा नदीचे किती पाणी मिळावे आणि आलमट्टीची उंची किती वाढवावी, याबाबत यापूर्वीच निर्णय झाला आहे. आलमट्टीची उंची वाढविण्यासाठी किती जमिनीची आवश्यकता आहे, याचा अंदाज बांधून भूसंपादनासाठी तयारी करण्यात आली आहे. आमचे सरकार हे काम लवकरच पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहे. अप्पर कृष्णा पाणीपुरवठा योजनेला राष्ट्रीय योजना म्हणून घोषित करण्याची विनंती करण्यात आली आहे, असे ते म्हणाले.
कृष्णा जल लवादाच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाच्या स्थगिती आदेशाबद्दल पत्रकारांनी विचारले असता शिवकुमार म्हणाले, हा विषय अनुसूची 524 अंतर्गत येतो. त्यामुळे याविषयी केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांनी बैठक घेणार असल्याचे सांगितले आहे. यावर आधीच चर्चा झाली आहे. आमचे काम आम्ही करत आहे.
कावेरी, कृष्णा आणि गोदावरी नद्याजोड प्रकल्पाबाबत आमच्या राज्याचा युक्तिवाद मी आणि मुख्यमंत्र्यांनी मांडला आहे. केंद्रीय मंत्र्यांनी यावर सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. जलशक्ती मंत्र्यांशी आमची भेट फलद्रूप ठरली आहे, असेही त्यांनी सांगितले.