गर्लगुंजी येथे नेम्मदी केंद्र सुरू करण्याबाबत महसूल मंत्र्यांना निवेदन
खानापूर : गर्लगुंजी विभागात येणाऱ्या गावांच्या सोयीसाठी गर्लगुंजी येथे शासनाच्यावतीने नेम्मदी केंद्र सुरू करण्यात यावे, अशा मागणीचे निवेदन गर्लगुंजी ग्रामस्थांच्यावतीने ग्रा. पं. सदस्य प्रसाद पाटील यांनी महसूल मंत्री कृष्ण बेरेगौडा यांना दिले आहे. जांबोटी येथे नेम्मदी केंद्र आहे. या नेम्मदी केंद्रात गर्लगुंजी परिसरातील माळअंकले, झाडअंकले, खेमेवाडी, इदलहोंड, गणेबैल, प्रभूनगर, निट्टूर, सिंगीनकोप, काटगाळी, शिवाजीनगर यासह इतर गावांचा समावेश आहे. जांबोटी येथे असलेल्या नेम्मदी केंद्रात सर्व आवश्यक कागदपत्रांच्या नोंदी करण्यासाठी गर्लगुंजी परिसरातील नागरिकांना जवळपास 30 कि. मी. चा प्रवास करुन जावे लागत आहे. त्यामुळे एका कामासाठी पूर्ण दिवस वेळ वाया जात आहे.
जांबोटी परिसर जंगलाने व्यापलेला
जांबोटी परिसर हा जंगलाने व्याप्त असल्याने, रात्री उशिरा काम आटोपून येताना प्राण्यांचा धोका मोठ्या प्रमाणात आहे. पावसाळ्यात कोणत्याही शासकीय वा शैक्षणिक कामासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे मिळविण्यासाठी जांबोटी येथील नेम्मदी केंद्रात हेलपाटे मारावे लागत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना वेळेत आवश्यक असलेली कागदपत्रे मिळत नसल्याने शैक्षणिक नुकसान होत आहे. यासाठी गर्लगुंजी येथे नेम्मदी केंद्र निर्माण करण्यात यावे, त्यामुळे गर्लगुंजी परिसरातील नागरिकांची आणि विद्यार्थ्यांची सोय होणार आहे. अशा मागणीचे निवेदन महसूल मंत्री कृष्ण बेरेगौडा यांना खानापूर दौऱ्यावेळी देण्यात आले.