हिडकलच्या पाण्यासाठी आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
‘आमचे पाणी, आमचा हक्क’आंदोलन बैठकीत निर्णय : जलवाहिनीचे काम थांबविण्याची मागणी
बेळगाव : हिडकल जलाशयातून हुबळी-धारवाड औद्योगिक वसाहतीला पाणी नेण्यासाठी जलवाहिनी घालण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. हे काम तातडीने थांबविण्यात यावे, या मागणीसाठी सोमवार दि. 3 रोजी प्रादेशिक आयुक्त आणि जिल्हाधिकारी कार्यालयांवर मोर्चा काढून निवेदन देण्याचा निर्णय ‘आमचे पाणी, आमचा हक्क’ आंदोलन बैठकीत घेण्यात आला. रविवार दि. 2 रोजी विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शहरात बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत सोमवारी प्रादेशिक आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला.
हिडकल जलाशयातून हुबळी-धारवाड औद्योगिक वसाहतीला पाणीपुरवठा केल्यास बेळगावसह बागलकोट परिसरातील जनतेलासुद्धा पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत हिडकलचे पाणी हुबळी-धारवाडला देण्यात येऊ नये, अशी मागणी यावेळी करण्यात आली. प्रथम पिण्यासाठी त्यानंतर शेतकऱ्यांसाठी पाणी दिले पाहिजे. मात्र लोकप्रतिनिधी आणि अधिकारी हा सर्व प्रकार माहिती असतानादेखील जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे आता बेळगावच्या जनतेनेच आवाज उठविण्याची गरज असल्याचे मत उपस्थितांनी बैठकीत व्यक्त केले.
सोमवारी प्रादेशिक आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिल्यानंतर कोणती पावले उचलली जाणार हे पाहिले जाणार आहे. त्यानंतर लढ्याची पुढील दिशा ठरविली जाणार आहे. त्यामुळे भविष्यात पाणीटंचाई निर्माण होऊ नये यासाठी बेळगावमधील समस्त जनतेने सोमवारी सकाळी 10.30 वाजता कन्नड साहित्य भवन येथे जमावे. त्यानंतर मोर्चाने जाऊन प्रादेशिक आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार आहे, असे आवाहन करण्यात आले आहे. बैठकीला समिती नेते रमाकांत कोंडुसकर, माजी मंत्री शशिकांत नाईक, रणजित चव्हाण-पाटील, दलित संघटनेचे नेते मल्लेश चौगुले, सामाजिक कार्यकर्ते सुजीत मुळगुंद यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.