For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

धनगर जमातीच्या एस.टी आरक्षण अंमलबजावणीसाठी तहसिलदारांना निवेदन

04:30 PM Sep 30, 2025 IST | अनुजा कुडतरकर
धनगर जमातीच्या एस टी आरक्षण अंमलबजावणीसाठी तहसिलदारांना निवेदन
Advertisement

ओटवणे | प्रतिनिधी
धनगर जमातीच्या एस टी आरक्षण अंमलबजावणीसाठी जालना येथे सुरू असलेल्या दीपक बोऱ्हाडे यांच्या आमरण उपोषणास पाठिंबासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एस टी आरक्षणाची मागणी तात्काळ पूर्ण करण्यासाठी धी सावंतवाडी तालुका धनगर समाजोन्नती मंडळ मुंबई व सकल धनगर समाज सावंतवाडीच्यावतीने सावंतवाडीचे तहसिलदार श्रीधर पाटील यांना निवेदन देण्यात आले. याबाबत सावंतवाडीचे तहसिलदार श्रीधर पाटील यांना दिलेल्या निवेदनानुसार, सन २०१४ बारामती येथे उपोषणकर्त्यासह धनगर समाजाच्या लाखोंच्या जनसमुदायाला संबोधित करताना, तुम्ही आम्हांला राज्याच्या सत्तेवर बसवा. आमची सत्ता आल्यास पहिल्याच कॅबिनेट बैठकीत आम्ही घटनादत्त धनगर एस.टी. आरक्षणाची अंमलबजावणी करतो. असे वचन दिले होते. परंतु आजपर्यंत कॅबिनेटच्या शेकडो बैठका झाल्या. शेकडो आंदोलनेही झाली. मात्र आपण दिलेला शब्द अद्याप पाळलेला नाही. त्यामुळेच आमचे बांधव दीपक बोहाडे १७ सप्टेंबरपासून गेले दोन आठवडे जालना जिल्ह्यातील अंबड चौफुली येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक येथे उपोषणास बसले आहेत. त्यांच्या या उपोषणास आमचा जाहीर पाठिंबा असून आपण धनगर जमातीच्या घटना दत्त एस.टी. आरक्षणाची अंमलबजावणी करुन दीपक बोऱ्हाडे यांचे उपोषण तात्काळ सोडवावे. अन्यथा दिपक बोऱ्हाडे यांनी आवाहन केल्याप्रमाणे राज्यभरात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल तसेच उपोषणकर्ते दीपक बोऱ्हाडे यांच्या जीवितास काही धोका झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी सरकारवर राहिल असा इशारा या पत्रकांद्वारे देण्यात आला आहे . यावेळी धी सावंतवाडी तालुका धनगर समाजोन्नती मंडळाचे सावंतवाडी तालुका अध्यक्ष लक्ष्मण नवलू पाटील, सचिव विलास जंगले ,उपाध्यक्ष आनंद वरक, खजिनदार लक्ष्मण धोंडू पाटील, सदस्य शेखर डोईफोडे, धाकू बुटे, रामा कोकरे, जनार्दन लांबर, लक्ष्मण गावडे, संजू गावडे, संतोष पाटील, संदीप पाटील, राजू पाटील, जनार्दन लांबर आदी कार्यकर्ते आणि समाज बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.