सावंतवाडी टर्मिनससाठी शेकापने वेधलं रेल्वेमंत्र्यांचे लक्ष
न्हावेली / वार्ताहर
शेतकरी कामगार पक्षाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष प्रसाद सुरेश साळवी यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांना निवेदन सादर करुन नांदेड पुणे पनवेल एक्सप्रेसचा विस्तार सावंतवाडी रोडपर्यंत करण्याची मागणी केली आहे. तसेच सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी विनंती केली आहे.शेकापचे नेते आमदार जयंत पाटील यांच्या माध्यमातून हा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.पुणे व कोकण विभागाला जोडणारी नियमित रेल्वेसेवा अपूरी आहे.पुणे एर्नाकुलम सुपरफास्ट एक्सप्रेस क्र.२२१४९/५० आठवड्यातून केवळ दोनदा धावते.ज्यामुळे प्रवाशांची गैरसोय होते यावर उपाय म्हणून नांदेड पनवेल एक्सप्रेसचा विस्तार सावंतवाडी पर्यत केल्यास पुणे ,कोथरुड ,पिंपरी चिंचवड आणि आसपासच्या प्रवाशांना फायदा होईल.ही गाडी कल्याण जंक्शनमार्गे वळवल्यास पनवेल येथे इंजिन बदलण्याची गरज राहणार नाही आणि पुणे कल्याण आणि सावंतवाडी अशी नवीन दैनंदिन सेवा सुरू होईल.यामुळे कल्याण डोंबिवली अंबरनाथ बदलापूरसारख्या भागातील प्रवाशांनाही कोकण रेल्वेमार्गाची थेट जोडणी मिळेल.निवेदनात म्हटले आहे की,सावंतवाडी स्थानकावर स्वतंत्र प्लॅटफॉर्म आणि टर्मिनस लाईन नसल्याने अडचणी येतात.निधीअभावी रखडलेला टर्मिनस प्रकल्पाचा दुसरा टप्पा पूर्ण करण्यासाठी निधी मंजूर करावा अशी विनंतीही करण्यात आली आहे.यासोबतच प्रवाशांच्या सोयीसाठी नवीन प्लॅटफॉर्मवर छत , पिण्याच्या पाण्याची सोय, आसन व्यवस्था, फूट ओव्हर ब्रीजचा विस्तार आणि उत्तम प्रकाश व्यवस्था करावी अशी मागणी करण्यात आली आहे.या सुधारणा सणासुदीच्या काळात जादा गाड्या चालवण्यासाठी उपयुक्त ठरतील असेही पत्रात नमूद केले आहे.सावंतवाडी स्थानक हे NSG-4 दर्जाचे असून २०२४-२५ मध्ये दररोज सरासरी २,१०० प्रवासी येथून प्रवास करतात.रात्रीच्या वेळी प्रवाशांची संख्या वाढत असल्याने मुंबईकडे जाणाऱ्या आणखी एका एक्सप्रेस गाडीचा थांबा येथे आवश्यक आहे.त्यामुळे CSMT मुंबई मंगळूर एक्सप्रेस ( क्र.१२१३३/ ३४ ) ला सावंतवाडी येथे थांबा देण्याच्या विंनतीही करण्यात आली आहे.शेतकरी कामगार पक्षाने रेल्वे मंत्रालयाकडून या मागण्यांवर सकारात्मक प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.