बी. एल. संतोषना गावडेंबाबत अहवाल सादर
भाजपाध्यक्ष, पंतप्रधानांना सादर होणार अहवाल : मुख्यमंत्र्यांना दिल्लीत बोलवून होणार निर्णय
पणजी : भाजपचे राष्ट्रीय नेते बी. एल. संतोष हे शुक्रवारी रात्री उशिरा पुन्हा गोव्यात आले आणि नंतर दाबोळी विमानतळावरून दिल्लीला रवाना झाले. त्यांच्याबरोबर प्रदेश भाजप अध्यक्ष दामू नाईक होते. गोव्याच्या संदर्भात त्यांनी अहवाल घेतला असून तो अहवाल ते राष्ट्रीय अध्यक्षांना तसेच पंतप्रधानांना सादर करणार आहेत. त्यानंतर मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षांना नवी दिल्लीत बोलून अंतिम निर्णय घेतला जाईल, मात्र त्यासाठी आणखी आठ दिवसांचा कालावधी लागेल. वादग्रस्त मंत्री गोविंद गावडे यांच्या संदर्भातील अहवाल सादर करण्यास संतोष यांनी दामू नाईक यांना सांगितले होते. त्यानुसार त्यांनी संपूर्ण अहवाल तयार करून त्याचे बाड संतोष यांच्या हाती सुपूर्द केले आहे. तत्पूर्वी गुऊवारी सायंकाळी त्यांचे आगमन गोव्यात झाल्यानंतर वास्को येथे त्यांच्या स्वागतासाठी स्वत: दामू नाईक हे गेले होते. मडगाव येथे त्यांनी दोघांनी एका हॉटेलमध्ये जेवण घेतले आणि मग ते कारवारला जायचे होते परंतु त्यांनी काणकोण येथे एका हॉटेलवर वास्तव्य केले. सकाळी दामू नाईक यांची गाडी घेऊन संतोष कारवारला गेले. कारवार येथील आपला कार्यक्रम आटोपून सायंकाळी ते गोव्यात आले.
संतोष-नाईक यांच्यात चर्चा
सायंकाळी गोव्यात दाखल झाल्यानंतर संतोष यांनी पुन्हा दामू नाईक यांच्याबरोबर चर्चा केली. नंतर त्यांनी दाबोळी विमानतळाकडे कूच केले. दाबोळी विमानतळावर त्यांचे स्वागत करण्यासाठी वास्कोचे आमदार दाजी साळकर उपस्थित होते. दामू नाईक आणि संतोष यांच्या दरम्यान बरीच चर्चा झाली आणि नंतर रात्री दहाच्या विमानाने संतोष हे दिल्लीला रवाना झाले.
पुढील आठवड्यात दिल्लीत चर्चा
गोव्याच्या एकंदरीत राजकारणावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व प्रदेश भाजप अध्यक्ष दामू नाईक या दोघांना पुढील आठवड्यात दिल्लीत बोलावून घेतले जाणार आहे. गोव्याचा विषय हा संतोष हे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा यांना सादर करतील आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी देखील ते चर्चा करतील. त्यानंतर मंत्रिमंडळाची फेररचना केली जाणार आहे. प्रदेश भाजप अध्यक्ष दामू नाईक यांनी यापूर्वीच निवेदन केलेले आहे की गावडे यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल. ते आपल्या वक्तव्याशी आणि निर्णयाशी ठाम आहेत आणि त्यांचा निर्णय पक्ष फेटाळणार नाहीत.