रेपो दर जैसे थे राहण्याचे संकेत : रिझर्व्ह बँक
वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीच्या बैठकीला सोमवारी प्रारंभ झाला असून सदरच्या बैठकीत रेपो दर जैसे थे ठेवले जाण्याचे संकेत व्यक्त होत आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीला प्रारंभ झाला असून 9 ऑक्टोबर रोजी रेपो दराबाबत निर्णय जाहीर केला जाणार आहे.
सध्याच्या देशाच्या आर्थिक स्थितीचा ताजा आढावा घेतानाच जागतिक पातळीवरील भू-राजकीय अस्थिर स्थितीचा आढावा घेतला जाणार आहे. सलग दहाव्या बैठकीमध्ये रेपो दर 6.5 टक्के इतकाच ठेवला जाणार असल्याचा अंदाज या क्षेत्रातील तज्ञांनी वर्तविला आहे. रॉयटर यांच्या पाहणीतदेखील निम्म्याहून अधिक अर्थतज्ञांनी रेपो दर बदलणार नसल्याचे म्हटले आहे. अलीकडेच अमेरिकेतील फेडरल रिझर्व्हने 50 बेसिस पाईंटस्ने व्याजदरात कपात केल्याने तमाम भारतीयांचे रेपो दराकडे लक्ष लागून राहिले आहे.
डिसेंबरमध्ये कपात?
सदरच्या बैठकीत रेपो दर कमी होतो का? हे पहावे लागणार आहे. बैठकीत निर्णय बुधवार 9 ऑक्टोबर रोजी जाहीर केला जाणार आहे. या बैठकीत निर्णय न घेतला गेल्यास पुढील डिसेंबरमध्ये होणाऱ्या पतधोरण समितीच्या बैठकीमध्ये रेपो दरात कपात केली जाण्याची शक्यता तज्ञांनी वर्तविली आहे.