रेपो दर ‘जैसे थे’
5.25 टक्के : रिझर्व्ह बँकेचा निर्णय, स्थिती आव्हानात्मक पण स्थिर
वृत्तसंस्था
मुंबई
रिझर्व्ह बँकेने अपेक्षेप्रमाणे रेपो दर सध्या आहे तितकाच, अर्थात 5.25 टक्के राखण्याचा निर्णय घेतला आहे. बँकेच्या संचालक मंडळाची बैठक बुधवारी पार पडली. सध्याच्या परिस्थितीत रेपो दरात कोणतेही परिवर्तन न करण्याचा निर्णय बैठकीत एकमुखाने घेण्यात आला. त्याचप्रमाणे स्टँडिंग डिपॉझिट फॅसिलिटी दर, (एसडीएफ), मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी दर (एमएसएफ) आणि बँक दर हे दरही अनुक्रमे 5 टक्के, 5.5 टक्के आणि 5.5 टक्के राखण्यात आले आहेत.
या निर्णयासमवेतच रिझर्व्ह बँकेने देशाची आर्थिक परिस्थिती, तिच्यासमोरील जागतिक आव्हाने, तसेच महागाई आणि पतस्थिती यांच्यासंबंधीही मतप्रदर्शन केले आहे. आर्थिक वर्ष 2027 मध्ये सर्वसाधारण महागाई दर 5 टक्के राहण्याची शक्यता आहे. आधीच्या अनुमानानुसार तो 5.1 असा राहणार होता. तसेच आर्थिक वर्ष 2026-2027 या वर्षात भारताचा विकास दर 6.7 टक्के राहील, असे प्रतिपादन रिझर्व्ह बँपेने केले आहे. आधींच्या अनुमानाप्रमाणे आर्थिक विकास दर 6.6 राहणार होता. आता अनुमानात किंचित वाढ करण्यात आली आहे.
विकासासंबंधी महत्वाचे मतप्रदर्शन
भारताचा विकासदर विद्यमान आर्थिक वर्षात काहीसा कमी राहणार आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या इंधन तेलाचे दर चढेच आहेत. तसेच जागतिक व्यापाराची स्थिती फारशी सुखावह नाही. या पार्श्वभूमीवर भारताचा संभाव्य विकास दर उठून दिसणारा असला, तरी तो थोडा कमी पातळीवरच राहणार आहे. महागाईची स्थिती जोपर्यंत सुस्पष्ट होत नाही, तो पर्यंत विकासदरात तेजी येण्याची शक्यता कमी आहे, ही बाबही रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी स्पष्ट केली. या आर्थिक वर्षाच्या प्रथम तिमाहीत महागाई दर अपेक्षेपेक्षा कमी पातळीवर राहिला. अन्नधान्यांचा महागाई दर पुरवठ्याच्या दबावामुळे काहीसा अधिक राहील. तथापि, मुख्य महागाई दर अपेक्षेपेक्षा काहीसा कमी राहील. पण एकंदर स्थिती समतोल आणि नियंत्रणात राहील, असेही संजय मल्होत्रा यांनी स्पष्ट केले आहे.
युद्धाचा परिणाम
अमेरिका आणि इराण यांच्यात पुन्हा युद्धाचा भडका उडाल्याने ऊर्जेच्या दरात अनिश्चितता निर्माण झाली आहे. मात्र, त्यामुळे फारशी चिंता करण्याचे कारण नाही. एकंदर स्थिती समाधानकार आहे. औद्योगिक उत्पादनाचा आणि वस्तू-उत्पादनाचा वाढदर उत्तम आहे. विशिष्ट क्षेत्रांमधील ग्राहकांची मागणीही मोठी आहे. त्यामुळे या आर्थिक वर्षाच्या प्रथम तिमाहीत आर्थिक परिस्थिती अपेक्षेपेक्षा उत्तम राहिली असून तत्काळ चिंतेचे कारण नाही, असे बँकेने दाखवून दिले आहे.
मान्सूनचा परिणाम...
यंदाच्या मान्सूनवर अल निनो तत्वाचा प्रभाव दिसून येत असल्याने काही प्रमाणात साशंकता आहे. देशाच्या काही भागात मोठा पाऊस पडला आहे, तर काही भागात तो अपेक्षेपेक्षाही कमी आहे. पावसाची विभागणी असमतोल असल्याचे दिसून येते. याचा पिकावर कितपत परिणाम होतो, हे नंतर समजणार आहे. मात्र, कृषीक्षेत्रातही परिस्थिती तुलनेने समाधानकारक असेल, अशी शक्यता आहे.
काय म्हणते रिझर्व्ह बँक...
ड जागतिक परिस्थिती पाहता रेपो दर स्थिर ठेवणे हेच आहे योग्य धोरण
ड या आर्थिक वर्षात महागाई दर 5 टक्के राहण्याची शक्यता दिसून येते
ड अमेरिकग-इराण युद्धाचा पुन्हा भडका उडाल्याने इंधन दर अनिश्चित