रेपो दर जैसे राहण्याची शक्यता
रिझर्व्ह बँक पतधोरण समिती बैठक आजपासून
वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय रिझर्व्ह बँकेची पतधोरण समितीची बैठक आज मंगळवार 6 फेब्रुवारीपासून सुरु होत असून ती 8 फेब्रुवारीपर्यंत आयोजित करण्यात आली आहे. सदरच्या बैठकीमध्ये रेपो दर जैसे थे राहणार असल्याचे संकेत तज्ञांनी व्यक्त केले आहेत.
गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या सात सदस्यांच्या बैठकीमध्ये आज व 7 फेब्रुवारी रोजी रेपोदराबाबत व बँकिंग संदर्भातील इतर धोरणाबाबत सविस्तर चर्चा केली जाणार आहे. गुरुवार 8 फेब्रुवारी रोजी रेपोदरा संदर्भातला निर्णय गव्हर्नर शक्तिकांत दास हे जाहीर करणार आहेत. महागाईचा स्तर सध्याला अधिक असून हे पाहता या बैठकीमध्ये रेपोदरामध्ये कपात केली जाण्याची शक्यता नसल्याचे बोलले जात आहे. या खेपेलाही रेपोदर ‘जैसे थे’च ठेवण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. गेल्या वर्षी फेब्रुवारी 2023 मध्ये रेपो दर 6.25 टक्क्यांवरून 6.50 टक्के इतका वाढवण्यात आला होता. त्यानंतर रेपोदरामध्ये आजतागायत कपात करण्यात आलेली नाही. डिसेंबरमध्ये 5.69 टक्के इतका असणारा किरकोळ महागाईदर अलीकडे बऱ्यापैकी नियंत्रणात राहिला आहे. मागच्या वर्षी जुलै 2023 मध्ये किरकोळ महागाई दर 7.44 टक्के इतका अधिक होता.