For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दिल्लीतील आंदोलनाचे आझाद मैदानावर पडसाद

06:56 AM Jul 23, 2026 IST | Tarun Bharat Portal
दिल्लीतील आंदोलनाचे आझाद मैदानावर पडसाद
Advertisement

त.भा. प्रतिनिधी

Advertisement

पणजी : दिल्ली येथे विद्यार्थ्यांनी आंदोलन केल्यानंतर हे प्रकरण ताजे असतानाच दक्षिण गोव्याचे भाजपचे माजी खासदार अॅड. नरेंद्र सावईकर यांनी केलेल्या एका कथित वक्तव्याचा निषेध करण्यासाठी काल, बुधवारी संध्याकाळी काँग्रेस, आम आदमी पार्टी तसेच विद्यार्थी संघटनांच्यावतीने संयुक्तपणे तीव्र निदर्शने करण्यात आली.

काँग्रेस नेते सुनील कवठणकर यांनी भाजप आणि नरेंद्र सावईकर यांना दिलेल्या 24 तासांच्या अल्टिमेटमची मुदत संपल्यानंतर काल बुधवारी काँग्रेस पक्ष अधिकच आक्रमक झालेला पाहायला मिळाला. संध्याकाळी 5 वाजता आझाद मैदानावर एकत्र आलेल्या काँग्रेस नेत्यांनी आणि विद्यार्थ्यांनी नरेंद्र सावईकर यांच्या भूमिकेचा तीव्र शब्दांत निषेध केला. आंदोलकांनी भाजप सरकार आणि माजी खासदारांविरोधात जोरदार घोषणाबाजी करत आझाद मैदान परिसर दणाणून सोडला.

Advertisement

या आंदोलनात काँग्रेसच्या मुख्य नेत्यांसोबतच विविध विद्यार्थी संघटनांचे प्रतिनिधी आणि तरुण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. गोव्यातील विविध सामाजिक आणि राजकीय मुद्यांवरून विरोधक आक्रमक असतानाच, आजच्या या आंदोलनाने पणजीतील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. नरेंद्र सावईकर यांनी त्यांच्या विधानाबद्दल बिनशर्त माफी मागावी, या मागणीवर काँग्रेस नेते आणि विद्यार्थी ठाम होते. आंदोलनकर्त्यांसमवेत काँग्रेसच्या महिला पदाधिकारी प्रतिमा कुतिन्हो, काँग्रेसच्या एनएसयुआय संघटनेचे माजी अध्यक्ष नौशाद चौधरी, रामा काणकोणकर व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

पोलिस बंदोबस्तात वाढ

बुधवारी संध्याकाळी आझाद मैदानावर झालेल्या या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पणजी पोलिसांनी तातडीने धाव घेत परिसरात मोठा बंदोबस्त तैनात केला होता. कायदा व सुव्यवस्थेचा कोणताही प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिस अधिकारी परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवूनहोते. सावईकर यांनी माफी न मागितल्यास हे आंदोलन आगामी काळात संपूर्ण राज्यभर अधिक तीव्र करण्याचा इशारा उपस्थित आंदोलनकर्त्यांनी याप्रसंगी दिला.

Advertisement
Tags :

.