कतारवरील इस्रायली हल्ल्याचे पडसाद : तिसऱ्या महायुद्धाची घंटा
संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेत फ्रान्सचा प्रस्ताव 142 विरुद्ध 10 मतांनी संमत झाला. 10 सप्टेंबरचा हा ठराव शांतता प्रस्थापनेवर भर देणारा आहे. युद्धामुळे प्रश्न सुटत नाहीत ते अधिक बिकट होतात, हे कळायला फार वेळ लागतो. तोपर्यंत युद्धामुळे जीवित आणि वित्तहानी प्रचंड होते, पण लक्षात कोण घेतो?
.इस्रायल-हमास आणि रशिया-युक्रेन या दोन्ही युद्धांचे असेच त्रांगडे झाले आहे. त्यात ट्रम्प यांच्या धरसोड धोरणाने पुन्हा विचका झाला आहे. सत्तेवर आल्यानंतर लगेचच दोन्ही युद्धे तत्काळ थांबवितो, असे म्हणणाऱ्या ट्रम्प यांना रोज नव्या डोकेदुखीला सामोरे जावे लागत आहे. त्यामध्ये नेत्यानेहू आणि पुतीन हे दोघेही आडमुठे असल्यामुळे प्रश्न विकोपाला जात आहेत. याला जबाबदार कोण, नेत्यानेहू रोज नवे डाव टाकतात, रोज नवे युद्धतंत्र खेळतात. त्यांच्या मोसाद या गुप्तहेर संघटनेने दिलेल्या माहितीवरून इस्रायलने कतारची राजधानी दोहा येथे हल्ला केला. त्यामध्ये हमासचा नेता खलील अलहय्याम याचा मुलगा आणि अन्य 6 रक्षक मारले गेले. हमासने मात्र आपले नेते सुरक्षित असल्याचा दावा केला आहे. तिकडे दोहा येथे अरब देशातील सर्व इस्लामी देशांचे 57 प्रतिनिधी या बैठकीस उपस्थित होते. त्यांनी इस्रायलच्या हल्ल्याचा निषेध केला आणि पॅलेस्टाईन भूमीचे स्थान अबाधित राखण्याच्या कल्पनेस पाठिंबा दिला. त्यामुळे अमेरिकेची गोची झाली असून, परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो हे नेत्यानेहू यांना भेटले आणि त्यांनी अमेरिकेच्या समर्थनाची हमी दिली. यापुढील राजकीय नाट्या कमालीचे रंगत आहे आणि खरी पंचायत अमेरिकेची झाली आहे. इस्रायला सोडता येत नाही आणि कतारमध्ये लष्करी तळ असल्यामुळे त्याला डावलता येत नाही, अशा विचित्र कोंडीत अमेरिका सापडली आहे. पण, सत्तेपुढे शहाणपण चालत नाही तसे काही कतारचे झाले आहे
भू-राजनैतिक महत्त्व
कतार या तेल उत्पादक बेटाचे आणि संपन्न राष्ट्राचे भू-राजनैतिक महत्त्व आहे. त्यामुळे तेथे अमेरिकेचा एक महत्त्वपूर्ण लष्करी तळ आहे. कतारच्या हितसंबंधांचे रक्षण करणे, ही बाब अमेरिकेला डावलता येत नाही. पण ज्यू हे अमेरिकन लोकसंख्येचा महत्त्वाचा भाग असल्यामुळे ज्यूंच्या हितसंबंधांचे रक्षण करण्यासाठी इस्रायलचे समर्थन करण्याशिवाय दुसरा पर्याय उरत नाही. नेत्यानेहू यांच्या वाढत्या महत्त्वाकांक्षा पाहता त्यांना आवरता आवरता ट्रम्प यांच्या नाकीनऊ आले आहे व त्यांचे पंख छाटणे आवरता कठीण झाले आहे. धरले तर चावते आणि सोडले तर पळते, अशी इस्रायलबाबत अमेरिकेची गत झाली आहे.
इस्रायलचे कुठे चुकले?
यशाच्या शिखरावर असलेले इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानेहू आता इस्रायलमध्ये निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. परंतु, त्यांच्या डोक्यावरचे चुकांचे गाठोडे मात्र वाढत आहे. परंतु ते नेमके कुठे चुकले, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यांच्या या कतारवरील हल्ल्यामुळे त्यांनी आखातातील सर्व अरब देशांचे शत्रुत्व विनाकारण ओढवून घेतले आहे आणि अमेरिकाही नाराज झाली आहे. आता त्यांना कुठे आणि कशी ठिगळे लावावयाची, याची समीकरणे मांडावी लागत आहेत. त्यातच त्यांची खरी पंचायत आहे. कतारवर हल्ला ही नेत्यानेहू यांची चूक ठरली काय, ती दुरुस्त करण्यासाठी त्यांना डोनाल्ड ट्रम्प यांच्यापुढे नमते घ्यावे लागत आहे. आता त्यांची कोंडी करण्याचा प्रयत्न सर्व अरब राष्ट्रे करत आहेत आणि त्याने सहा देशांवर केलेल्या हल्ल्याचे भांडवल करत आहेत. या सर्व आरोपांतून त्यांची सुटका कशी होणार, हा त्यांच्या पुढे असलेला खरा यक्षप्रश्न आहे. आता त्यांना त्यामुळे दोन्ही बाजूंनी तारेवरची कसरत करावी लागत आहे.
इस्रायलने कतारवर केलेला हल्ला हा अनेक नवे गुंतागुंतीचे प्रश्न निर्माण करणारा ठरला आहे. या हल्ल्यामुळे हमासचे तेथे लपलेले नेते त्यांचे लक्ष होते. पण, ते साध्य झाले नाही. या हल्ल्याने अमेरिका-कतार दरम्यान असलेले संबंध विनाकारण बिघडले आहेत काय? कतारमध्ये अमेरिकेचा मोठा लष्करी तळ आहे. दोहोंमध्ये झालेल्या जीसीसी म्हणजे आखाती देशाच्या परिषदेने इस्रायलविरुद्ध एल्गार प्रकट केला, त्यामुळे मध्यपूर्वेतील तणाव वाढला आहे.
यशापयशाची सावली
इस्रायलचे नेते बेंजामिन नेत्यानेहू यांच्यापुढे आता यशापशाची सावली उभी आहे. संपूर्ण गाझापट्टी खाली करण्याचे त्यांचे दिवास्वप्न पूर्ण होणार की, अपुरे राहणार हा त्यांच्यापुढे बाका प्रश्न आहे. संयुक्त राष्ट्रसंघाने केलेला ठराव आणि
पॅलेस्टाईनला स्वतंत्र राज्याचा दर्जा कायम ठेवण्याचा आग्रह यूनोच्या आमसभेचा आहे. हा ठराव पाहता इस्रायल आणि खुद्द अमेरिका दोघेही गाझा पट्टी सोडायला तयार नाहीत. त्यात संयुक्त राष्ट्रसंघात अमेरिकेचा झालेला पराभव दोघांचीही चिंता वाढविणारी आहे. राजकारणात जर मोठे अपयश पदरी आले तर यशाचे श्रेय मागे पडते आणि मग चिंता वाढतात, तशीच काहीशी अवस्था नेत्यानेहू यांची होत आहे. त्यांच्या राजकारणाला एक नवे वळण लागत आहे. परिस्थितीवर ते कशी मात करतात, त्यात त्यांची कसोटी दिसून येणार आहे.
इस्रायल आणि हमासमधील संघर्षाने नवे वळण घेतले आहे. विशेषत: इस्रायलने कतारमध्ये लपलेल्या हमासच्या नेत्यांचा काटा काढण्यासाठी केलेली कारवाई कतारला व्यथित करणारी ठरली आहे. इस्रायलच्या विरोधात सर्व इस्लामिक राष्ट्रे एकवटत आहेत आणि त्यांची कतारमध्ये दोहा येथे झालेली परिषद ही इस्रायलपुढे नवे आव्हान ठरली आहे. या संघर्षातून जगापुढे अनेक बिकट प्रश्न निर्माण होत आहेत आणि हे प्रश्न कशाप्रकारे सोडवावयाचे, याबद्दल संयुक्त राष्ट्रसंघाला नवी डावपेचात्मक पावले टाकावी लागणार आहेत. आजवर हमास ही संघटना एकाकी पडली होती. परंतु, आता सर्व इस्लामिक राष्ट्रे तिच्या पाठीशी उभी राहिल्यास इस्रायलवर एक मोठा दबाव निर्माण होणार आहे. हा तणाव जर वाढत गेला तर जागतिक संघर्ष आणि ताणतणाव वाढत जाईल व त्यातून अनेक नवे प्रश्न उभे राहतील, अशी चिन्हे दिसत आहेत. या गुंतागुंतीच्या प्रश्नांमुळे जग हादरले आहे.
जीवित-वित्तहानीचा डोंगर
हमास-इस्रायल दरम्यान झालेल्या संघर्षात आतापर्यंत पॅलेस्टाईनमधील 6,600 लोकांनी प्राण गमावले आहेत. तर 1983 इस्रायली लोकांनी आपले जीवन समर्पित केले. रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धाने सुद्धा असंख्य निष्पाप लोकांचे प्राण घेतले. या संघर्षामध्ये रशियाने 2 लाख 50 हजार प्राण गमावले, तर युक्रेनमध्ये सुमारे 60 हजार ते 1 लाख लोकांना प्राणास मुकावे लागले तसेच जखमींची संख्यासुद्धा लाखोंच्या घरात पोहचली आहे. ही सर्व आकडेवारी दुसऱ्या महायुद्धापेक्षाही अधिक आहे. याचा अर्थ असा होतो की, या दोन्ही युद्धामध्ये आतापर्यंत झालेले नुकसान पाहता जणू काही कळत-नकळत तिसरे महायुद्ध लढले जात आहे आणि त्याला पूर्णविराम कधी व कसा मिळेल, हा खरा प्रश्न आहे. भारतासारख्या तटस्थ राष्ट्राने नेहमीच शांतता आणि तडजोडीने प्रश्न सोडविण्यावर भर दिला आहे. युद्ध आणि तणाव नव्हे तर संवाद आणि कुटनिती हाच संघर्ष टाळण्याचा मार्ग आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी वारंवार सांगत आहेत. विश्वगुरू या नात्याने भारत शांततेचा मंत्र जपत आहे आणि तडजोडीचे आवाहन करत आहे. परंतु, भांडणारे दोन्ही गट आपलेच म्हणणे खरे आहे या तालात युद्ध संपविण्यासाठी पुढाकार घेत नाहीत, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. युद्ध आणि तणाव हे एक न संपणारे महाभारत आहे. आता यामध्ये खरा वनवास होतो तो सामान्य माणसाचा. हजारो लोकांची कुटुंबे उध्वस्त झाली. त्यांना निर्वासित म्हणून दुसरीकडे आश्रय घ्यावा लागला. गाझापट्टीतील हजारो
पॅलेस्टिनी आपला जीव वाचवण्यासाठी इतरत्र स्थलांतर करत आहेत. जगी जास कोणी नाही त्यास देव आहे, या न्यायाने ते आता देवाकडेच आश्रय घेत आहेत. आता इस्रायलने पॅलेस्टिनी लोकांना गाझापट्टीतून बाहेर पडण्यासाठी नवे मार्ग दाखविले आहेत. या निर्वासितांचे भवितव्य अंध:कारमय आहे. गाझापट्टीचे पुनर्वसन करायला किमान 50 वर्षे लागतील. पण, हे पुनर्वसन कोण करणार, कसे करणार, युद्ध कधी थांबणार, संघर्षाची गाठ, निरगाठ कधी सुटणार, हा खरा महत्त्वाचा प्रश्न आहे.
सुंभ जळाला तरी पीळ कायम, अशी एक म्हण आहे. त्याप्रमाणे इस्रायलचे नेत्यानेहू हे आपला अहंकार सोडायला तयार नाहीत. आपल्याला पराभव कधी येऊ शकत नाही, हे त्यांचे महत्त्वाकांक्षी मत किती काळ टिकेल, हा खरा प्रश्न आहे. त्याने इस्रायलला शाळाकडून बाळाकडे आणले. एक प्रकारची शक्ती दिली आणि अपमानाचा वचपा काढला. परंतु, आता भविष्य काळात ओलीसांची सुटका कशी करणार? आणखी एक प्रश्न इस्रायलपुढे सतावणार आहे, हा प्रश्न सोडविण्यात नेत्यानेहू यांची कसोटी लागणार आहे.
प्रा. डॉ. वि. ल. धारूरकर