गणेशोत्सवापूर्वी महामार्गावरील कामांची दुरुस्ती
रत्नागिरी :
गणेशोत्सवासाठी गावी येणाऱ्या कोकणवासियांसाठी महामार्गावरील प्रवास सुकर आणि सुरक्षित करण्यासाठी तातडीने दुरुस्तीची कामे हाती घेण्यात यावीत. महामार्गाच्या कामांमुळे वारंवार अपघात होणाऱ्या ठिकाणी (ब्लॅक स्पॉट) सुविधा केंद्र स्थापन करा, अशा सूचना सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. गेले २ दिवस त्यांनी केलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाच्या पाहणीनंतर रत्नागिरीत राष्ट्रीय महामार्ग ६६ संदर्भात आढावा बैठक घेतली.
रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातून जाणाऱ्या मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी करून मंत्री भोसले यांनी शासकीय विश्रामगृहात शुक्रवारी राष्ट्रीय महामार्ग ६६ संदर्भात आढावा बैठक घेतली. बैठकीला आमदार किरण सामंत, जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह, पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता शरद राजभोज, अपर जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, माजी आमदार राजन साळवी, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजवर्धन करपे आदी उपस्थित होते. या घेतलेल्या बैठकीत चिपळुणातील नव्याने बांधकाम सुरु असलेला पूल जानेवारी २०२६ मध्ये वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. तर संगमेश्वर ते लांजा या टप्प्यातील कामे डिसेंबर २०२५ मध्ये पूर्ण होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. महामार्गाच्या कामादरम्यान सर्व्हिस रोड, पुलांची वाढीव बांधकामे तसेच अन्य दुरुस्त्यांसाठी २०० कोटींचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे देण्यात येणार असल्याचे यावेळी मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी सांगितले.
- आवश्यक तेथे सुविधा केंद्र उभारणार
गणेशोत्सवासाठी जिल्ह्यात येणाऱ्या प्रवाशांना खराब रस्त्यांची, वाहतूककोंडीबाबत कोणतीही अडचण येता कामा नये. रस्त्यांवरील खड्डे बुजवावेत. चिखल हटवून तातडीने दुरुस्ती करावी. ज्या ठिकाणी विजेची मागणी आहे, तिथे हायमॅक्स लावून द्या. काही ठिकाणी पेवरब्लॉक बसविण्याचे काम सुरु आहे, ते व्यवस्थित बसले पाहिजेत. त्याचा वाहतुकीसाठी कोणताच त्रास होता कामा नये. घाटाच्या ठिकाणी मातीची धूप रोखण्यासाठी वृक्षारोपण करा. प्रवाशांसाठी सुविधा केंद्र, रुग्णवाहिका, याबरोबरच पर्यायी रस्ता या बाबतचे फलक, पोलीस सार्वजनिक बांधकाम विभाग, उपप्रादेशिक परिवहन विभाग या सर्वांनी लावून प्रवाशांना सुविधा द्याव्यात, अशा सूचना मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी केल्या.
- ठेकेदारांना तातडीने कामे पूर्ण करण्याच्या सूचना
संगमेश्वर ते लांजा तालुक्यातील महामार्गाची कामे डिसेंबर २०२५ पर्यंत पूर्ण होणार आहेत. या दरम्यान असलेली पुलांची कामे आता अंतिम टप्यात आली आहेत. त्यामुळे संबंधित ठेकेदारांना ही कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे भोसले यांनी सांगितले.
- महामार्गावर मुख्यमंत्र्यांसोबतच केंद्रीय मंत्री गडकरींचेही लक्ष
महाराष्ट्रातल्या कंत्राटदारांची ९,५०० कोटीची देणी राज्य शासनाने दिली आहेत. यात कोकणातल्याही कंत्राटदारांचा समावेश आहे. गेली १७वर्ष या महामार्गाचे काम रखडल्याने आता या महामार्गाच्या पूर्णत्वासाठी मुखमंत्र्यांसह स्वतः केंद्रिय मंत्री नितीन गडकरी यांचेही लक्ष आहे. त्यामुळे कंत्राटदारांचे प्रश्न मार्गी लागतील व हा महामार्ग पूर्ण होईल, असा विश्वास मंत्री भोसले यांनी व्यक्त केला.
मंडणगड येथील न्यायालय बांधकाम इमारतीबाबतही त्यांनी यावेळी आढावा घेतला. उपप्रादेशिक परिवहन विभागाने संगणकीय सादरीकरण करत रस्त्यांबाबत उपाययोजनांविषयीची माहिती दिली.
- वाढीव कामांसाठी २०० कोटींच्या नवीन प्रस्तावाचे काम सुरू
महामार्गाचा हा प्रकल्प १५ वर्षापूर्वी मंजूर झाला आहे. त्यामुळे नवीन सर्व्हिस रोड, आधुनिक बांधकामांची कामे, नवीन अंडरपास, परशुराम घाटातील पर्यायी मार्ग अशा नवीन कामांसाठी २०० कोटींचा प्रस्ताव तयार करण्याचे काम सध्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात येत आहे. या प्रस्तावातच आवश्यक अशा नवीन कामांचा समावेश करण्यात येणार असल्याचे भोसले यांनी सांगितले.
- नवीन डिझाईनप्रमाणे उड्डाण पुलाचे काम सुरु : मंत्री भोसले
चिपळूण येथील उड्डाण पूल त्याच ठेकेदाराकडून बांधून घेण्यात येत असून या नवीन कामासाठी नवीन डिझाईन करून काम सुरु करण्यात आले आहे. या कामासाठी त्याला कोणताही अतिरिक्त निधी देण्यात येणार नाही. हा पूलही जानेवारी २०२६ मध्ये वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार असल्याचे मंत्री भोसले यांनी सांगितले.