महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

गोव्याला जोडणाऱ्या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करा

11:01 AM Feb 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सिटीझन्स कौन्सिल व दि बेलगाम ट्रेडर्स फोरमचे केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांना निवेदन

Advertisement

बेळगाव : बेळगाव व गोवा यांच्यामध्ये आयात-निर्यात व्यापार उद्योग यादृष्टीने पूर्वापार संबंध आहेत. त्यामुळे बेळगावहून गोव्याला जाणाऱ्या महामार्गाचे रुंदीकरण करून चार पदरी महामार्ग तयार करावा, अशी मागणी ‘तरुण भारत’चे समूहप्रमुख व सल्लागार संपादक किरण ठाकुर यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग  मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली. बेळगावमधील रिंगरोड कामाच्या उद्घाटनासह उत्तर कर्नाटकातील विविध विकासकामांच्या शुभारंभासाठी नितीन गडकरी गुरुवारी बेळगावमध्ये आले होते. त्यावेळी सांबरा विमानतळावर किरण ठाकुर यांनी त्यांची भेट घेऊन बेळगाव-चोर्ला रस्ता, मोपा एअरपोर्ट व अन्य वाहतूक सुविधांबद्दल चर्चा केली. हा रस्ता खराब असल्याने वाहनचालकांचे हाल होत आहेत. याशिवाय त्याचा परिणाम व्यापार आणि उद्योगावर होत आहे. जर महामार्ग तयार झाला तर व्यापार उद्योग वाढीस लागेल आणि विकासाला गती येईल, असेही किरण ठाकुर यांनी नितीन गडकरी यांना सांगितले. बेळगाव-गोवा व्हाया चंदगड, आंबोली हा रस्ता कर्नाटक, महाराष्ट्र या दोन राज्यांमधून गोव्याला जोडला जातो. त्याचे चौपदरीकरण झाल्यास कोल्हापूर जिल्ह्याचा विकास होईल व मोपा इंटरनॅशनल एअरपोर्टला जाण्यासाठी बेळगाव, कोल्हापूरच्या नागरिकांची सोय होईल. त्यामुळे या रस्त्याचा विकास करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नितीन गडकरी यांच्या निदर्शनास आणून दिले व बेळगाव-जांबोटी-कणकुंबी-चोर्ला रस्ता लवकरात लवकर करण्याची विनंती केली.

Advertisement

बेलगाम ट्रेडर्स फोरमतर्फेही निवेदन

बेळगाव-चोर्ला या गोव्या रस्त्याची अत्यंत दुरावस्था झाली असून त्यामुळे वाहन चालविणे कठीण झाले आहे. इतकेच नव्हे तर या रस्त्याच्या दयनीय अवस्थेमुळे व्यापार व उद्योगावरही परिणाम होत आहे. त्यामुळे लवकरात लवकर या रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी बेलगाम ट्रेडर्स फोरमतर्फे केंद्रिय रस्ते व भूपृष्ट वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना देण्यात आले. बेळगावचे नागरिक, व्यापारी, उद्योजक, पर्यटक यांच्यावतीने सदर निवेदन देण्यात आले असून निवेदनात म्हटले आहे, की बेळगावहून गोव्याला जाणाऱ्या महामार्गाचे रुंदीकरण करुन चारपदरी मार्ग तयार झाल्यास बेळगाव आणि गोवा यांच्यातील व्यापार वृद्धींगत होईल. तसेच  वाहनचालकांचे हाल कमी होतील.

बेळगाव शहरामध्ये प्रादेशिक आयुक्त कार्यालय आहे. जिल्हा न्यायालये, कौटुंबिक न्यायालये, ग्राहक न्यायालय यासह इतर न्यायालये आणि प्रशासकीय कार्यालये आहेत. त्यामुळे बेळगावकडे येणाऱ्यांची संख्या अधिक आहे. बेळगाव शहर हे महाराष्ट्र आणि गोव्याच्या सीमेवर वसले आहे. त्यामुळे या दोन्ही राज्यातूनही मोठ्या प्रमाणात नागरिक येत असतात. त्यामुळे बेळगाव शहराचाही विकास व्हावा, यासाठी ठोस योजना राबवावी, असेही निवेदनात म्हटले आहे. शहराचा स्मार्टसिटीमध्ये समावेश करण्यात आला आहे. मात्र, म्हणावा तसा अद्याप विकास झाला नाही. बेळगाव ही सध्या एक मुख्य बाजारपेठ ठरत आहे. शेजारील राज्यांमधून बेळगावमध्ये खरेदीसाठी नागरिक व पर्यटक येत असतात. तेव्हा चोर्ला मार्गाची तातडीने दुरुस्ती करावी. याचबरोबर अनमोडहून गोव्याला जाणाऱ्या रस्त्याचे काम सात वर्षांपासून ठप्प झाले आहे. तर चोर्ला रोडचे काम सहा वर्षांपासून प्रलंबित असून लोकांच्या आंदोलनानंतर तात्पुरती डागडुजी केली जाते. याचबरोबर सध्या सुरू असलेले काम अत्यंत संथगतीने सुरू असून तातडीने या रस्त्यावरील पुलांची बांधणी करून हा रस्ता पूर्ण करावा, असेही या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

बेळगाव जिल्ह्यातून गोव्याला दूध, भाजीपाला यासह इतर साहित्य पुरवठा केला जातो. मात्र, केवळ दीडशे किलोमीटरचा असलेला हा रस्ता दुरुस्त न झाल्यामुळे समस्या निर्माण झाली आहे. केवळ बेळगावमधूनच नाही तर हुबळी, धारवाड, बळ्ळारी, विजयपूर, कोल्हापूर, कारवार या परिसरातील वाहने बेळगावमधून गोव्याला ये-जा करत असतात. त्यामुळे या रस्त्यावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे, अशी मागणी करण्यात आली आहे. बेळगावमधील नागरिकांना आंतरराष्ट्रीय सेवेसाठी मोपा एअरपोर्टवर अलीकडे अवलंबून रहावे लागत आहे. त्यामुळे बरेच प्रवासी विमानाने जाण्यासाठी मोपा एअरपोर्टकडे ये-जा करत असतात. तेव्हा रस्त्याची दुरुस्ती करणे महत्त्वाचे आहे. बेळगावमधीलच नाही तर महाराष्ट्रातील चंदगड, आजरा, गडहिंग्लज, कोल्हापूर प्रवासी गोव्याला जात आहेत. तेव्हा याचाही गांभीर्याने विचार करून गोव्याला जोडणाऱ्या सर्वच रस्त्यांची दुरुस्ती करावी, असे या निवेदनात म्हटले आहे. किरण ठाकुर यांच्यासह सिटीझन कौन्सिलचे अध्यक्ष सतीश तेंडोलकर, लोकमान्यचे सीईओ अभिजीत दीक्षित, किरण गावडे, केसीसीआयचे स्थानिक सदस्य अरुण कुलकर्णी यांच्या या निवेदनावर सह्या आहेत.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article