For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

पावसाळ्यापूर्वी नंदगड धरणाची दुरुस्ती करा

12:55 PM May 26, 2026 IST | Tarun Bharat Portal
पावसाळ्यापूर्वी नंदगड धरणाची दुरुस्ती करा
Advertisement

 अन्यथा तीव्र आंदोलनाचा शेतकऱ्यांचा लघुपाटबंधारे विभागाला इशारा

Advertisement

वार्ताहर/हलशी

नंदगड येथील लघुपाटबंधारे खात्याच्या अखत्यारित येणाऱ्या धरणाचे नादुरुस्त दरवाजे आणि कालव्यांची झालेली दुरवस्था यामुळे पाण्याची मोठ्या प्रमाणात नासाडी होत असून, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. पावसाळ्यापूर्वी धरणाच्या दरवाज्यांची दुरुस्ती करण्यात यावी, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा नंदगड परिसरातील शेतकऱ्यांनी दिला आहे. नंदगडच्या पश्चिम दिशेला असलेले हे धरण म्हणजे परिसरातील शेतकऱ्यांसाठी जीवनदायिनी ठरली आहे. कै. बसापण्णा अरगावी यांच्या दूरदृष्टी संकल्पनेतून आणि शेतकऱ्यांच्या अभूतपूर्व सहकार्यातून या धरणाची निर्मिती करण्यात आली होती. नंदगड परिसरातील संपूर्ण शेती पाण्याखाली आणून शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती बळकट करणे आणि परिसराचा विकास करणे, हा यामागील मुख्य उद्देश होता. मात्र आज प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे या संकल्पनेलाच ग्रहण लागले आहे.

Advertisement

उत्तर-दक्षिणचे दोन्ही मुख्य दरवाजे नादुरुस्त

सध्या या धरणाची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून शेतकऱ्यांना पाणी मिळवण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. धरणाला उत्तर आणि दक्षिण असे दोन मुख्य दरवाजे आहेत. हे दोन्ही दरवाजे सध्या पूर्णपणे नादुरुस्त आहेत. शेतीसाठी पाणी सोडताना किंवा बंद करताना हे दरवाजे नीट काम करत नाहीत, ज्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाण्याची गळती होत आहे. दक्षिणेकडील दरवाजाकडे जाण्यासाठी बनवण्यात आलेली काँक्रीटची शिडी पूर्णपणे तुटून पडली आहे. त्यामुळे नादुरुस्त दरवाजातून पाणी सोडताना कर्मचाऱ्यांना आणि शेतकऱ्यांना जीव धोक्यात घालून कसरत करावी लागत आहे.

कालव्यांचे नूतनीकरण,खोलबंदी आवश्यक

शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या आणि आवश्यक सुधारणा कालव्यांचे नूतनीकरण : धरणाच्या दोन्ही बाजूंच्या मुख्य कालव्यांचे तातडीने काँक्रीटीकरण व नूतनीकरण करण्यात यावे. कालव्यांची खोलबंदी : शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पाणी पोहोचवणाऱ्या उप-कालव्यांची (चर) तातडीने खोलबंदी व स्वच्छता करणे गरजेचे आहे. कायमस्वरूपी शिपायाची नियुक्ती : धरणावरील पाणीपुरवठ्याचे चोख नियोजन करण्यासाठी आणि देखभालीसाठी तिथे 24 तास कायमस्वरूपी शिपायाची (वॉचमन) नियुक्ती करण्यात यावी.

भूजल पातळी वाढविणे शक्य

शेतकऱ्यांच्या मते जर या धरणाचे दरवाजे आणि कालवे वेळेत दुरुस्त केले तर धरणातील पाण्याचा अपव्यय टळेल. हेच अतिरिक्त पाणी नंदगड परिसरातील इतर लहान-मोठ्या तलावांमध्ये सोडून ते तलाव वर्षभर तुडुंब भरून ठेवता येतील. यामुळे भूजल पातळी वाढेल आणि शेतकऱ्यांना उन्हाळी व इतर हंगामी पिके घेऊन आर्थिक प्रगती साधता येईल, यासाठी लघु पाटबंधारे खात्याने नंदगडच्या धरणाची तातडीने दुरुस्तीचे काम हाती घेण्यात यावे, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.

Advertisement
Tags :

.