For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सार्वजनिक बांधकामने दुर्लक्ष केलेल्या ओटवणेतील मोरीची श्रमदानातून दुरुस्ती

04:12 PM Jun 13, 2026 IST | अनुजा कुडतरकर
सार्वजनिक बांधकामने दुर्लक्ष केलेल्या ओटवणेतील मोरीची श्रमदानातून दुरुस्ती
Advertisement

ओटवणे चॅरिटेबल ग्रुपचा पुढाकार

Advertisement

ओटवणे : प्रतिनिधी
चराठा - ओटवणे घाटरस्त्या दरम्यानच्या मोरीचे बांधकाम ठेकेदाराने अर्धवट स्थितीत ठेवल्यामुळे मोरीच्या पाईपवरील भर रस्त्याचा भाग खचला. याबाबत सार्वजनिक बांधकाम खात्याचे लक्ष वेधूनही कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही. त्यामुळे अखेर या ठिकाणी संभाव्य अपघात टाळण्यासाठी ओटवणे चॅरिटेबल ग्रुप पदाधिकाऱ्यांनी मोरीच्या पाईपवरील खचलेला भाग श्रमदानाने बुजविला. त्यामुळे ओटवणे चॅरिटेबल ग्रुपच्या या उपक्रमाचे वाहन चालकांनी कौतुक केले आहे.

बांधकाम खात्याबाबत तीव्र नाराजी

Advertisement

ओटवणे दशक्रोशीत वाहतुकीच्या दृष्टीने हा महत्त्वाचा मार्ग असून हा रस्ता पुढे दोडामार्ग तालुक्यात जातो. त्यामुळे या मार्गावर वाहनांची नेहमी वर्दळ असते. मात्र ओटवणे घाटीतील या मोरीच्या पाईपवरील खचलेल्या भागाकडे गेले वर्षभर दुर्लक्ष झाल्यामुळे येत्या पावसाळ्यात ही मोरी आणखी खचून या मार्गावरील वाहतूक ऐन पावसाळ्यात ठप्प होण्याची भीती होती. याबाबत सार्वजनिक बांधकाम खात्याचे अनेक वेळा लक्ष वेधले. परंतु कोणतीही कार्यवाही करण्यात आले नाही. त्यामुळे संबंधित खात्याच्या उदासीन भूमिका व बेजबाबदारपणाबाबत वाहन चालकांमध्ये तीव्र नाराजी होती. त्यामुळे या घाट रस्त्याला कोण वाली आहे की नाही? असा सवाल वाहन चालकांमधून व्यक्त केला जात होता.

बांधकाम खात्याच्या निषेधार्थ
खर्चासाठी प्रत्येकी १ रुपया

या खचलेल्या मोरीकडे सार्वजनिक बांधकाम खात्याने अक्षम्य दुर्लक्ष केल्याने त्यांच्या निषेधार्थ ओटवणे चॅरिटेबल ग्रुपने मोरीच्या पाईप वरील खचलेला भाग बुजवण्यासाठी पर्यायाने खडी, वाळू, सिमेंट या साहित्याच्या खर्चासाठी ग्रुपच्या गुगल पे नंबर वर एक रुपया गुगल पे करण्याचे आवाहन ओटवणे वासियांना केले होते. याला ओटवणे वासीयांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. प्रत्येकी अवघा एक रुपयाच्या मदतीतून साहित्य आणण्यात आले.

शाळकरी भावंडाचाही सहभाग

या श्रमदानात ओटवणे चॅरिटेबल ग्रुपच्या संतोष भैरवकर, संतोष तावडे, भाजपा शक्ति केंद्र प्रमुख प्रशांत बुराण, सत्यवान गावकर, जयगणेश गावकर, निलेश माटेकर, ओमकार परब, नामदेव वारंग यांनी या श्रमदानात सहभाग घेतला. उल्लेखनीय म्हणजे कु राज संतोष भैरवकर आणि कु दर्श संतोष भैरवकर या शाळकरी भावंडानीही यात सहभाग घेतला. या दोन्ही मुलांची श्रमदानातील उपस्थिती लक्षवेधी ठरली.

Advertisement
Tags :

.