For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

खड्डेमय रस्त्याची कंग्राळी बुद्रुक ग्रामपंचायत कडून डागडुजी

10:53 AM Sep 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
खड्डेमय रस्त्याची कंग्राळी बुद्रुक ग्रामपंचायत कडून डागडुजी
Advertisement

कंग्राळी बुद्रुक-शाहूनगर रस्ता तात्पुरता खड्डेमुक्त : वाहनधारकांसह ग्रामस्थांतून समाधान

Advertisement

वार्ताहर /कंग्राळी बुद्रुक 

अखेर कंग्राळी बुद्रुक ग्रा.पं.ने कंग्राळी बुद्रुक ते शाहूनगर रस्त्यावरील जेसीबीच्या सहाय्याने  खड्डे बुजवून रस्ता वाहतुकीला सुरळीत केल्यामुळे ग्रा. पं.च्या विशेष कार्याबद्दल समाधान व्यक्त करण्यात येत आहे.कंग्राळी बुद्रुक-शाहूनगर रस्त्याचे पाच वर्षापूर्वी ग्रामीणच्या आमदार व बाल कल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या फंडातून करण्यात आले होते. गेल्या दोन वर्षापासून तर सदर रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले होते. यामुळे वाहनधारकांना खड्डेमय रस्त्यातून रस्ता शोधत वाहने चालवावी लागत होती. सदर रस्त्याच्या डांबरीकरण संदर्भात ‘तरुण भारत’ वृत्तपत्रातून अनेकवेळा आवाज उठविण्यात आला. परंतु शासनाबरोबर लोकप्रतिनिधींचेही डोळे उघडले नाहीत. खड्डेमय रस्त्यावरून वाहनधारकांना मात्र वाहने चालविताना कसरत करणे थांबली नाही.

Advertisement

ग्रा. पं. अध्यक्ष-उपाध्यक्षांच्या निष्काळजीपणामुळे विकासकामांना खीळ 

गेल्या अनेक मासीक मिटिंगना ग्रा. पं. अध्यक्षा व उपाध्यक्षा अनुपस्थित राहिल्यामुळेच विकासकामांना खीळ बसल्याची खंत ग्रा. पं. सदस्यांतून व्यक्त होताना दिसत आहे. कंग्राळी बुद्रुक गावची लोकसंख्या 25 हजाराहून अधिक आहे. पंचायतमध्ये एकूण 13 वॉर्ड आहेत. सदस्य संख्या 34 आहे. एवढ्या विस्ताराने मोठ्या ग्रा. पं. ला विकास फंडसुद्धा भरपूर येतो. सदर फंड मासिक मिटींगमध्ये 13 वॉर्डमधील कोणत्या वॉर्डात वापरून विकास करणे या संदर्भात मिटिंग असते. तसेच सदर मिटिंगमध्ये अध्यक्ष, उपाध्यक्षांच्या परवानगीने विकास फंडाची विभागणी करायची असते. परंतु गेल्या अनेक मासिक मिटींगला अध्यक्षा, उपाध्यक्षा अनुपस्थित रहात असल्यामुळे विकास कामांना खीळ बसली आहे. त्यातच शासनाचेसुद्धा दुर्लक्ष झाल्याची खंत ग्रा. पं. सदस्यांकडून व्यक्त होतानाचे चित्र दिसून येत आहे.

रस्ता तात्पुरता खड्डेमुक्त 

कंग्राळी बुद्रुक ते शाहूनगर रस्ता खड्ड्यांमध्ये हरवून गेला होता. अखेर ग्रा. पं. सदस्यांनीच ज्येष्ठ ग्रा. पं. सदस्य सद्याप्पा राजकट्टी यांची प्रभारी अध्यक्ष म्हणून निवड करून विकास कामांना सुरुवात केली. ग्रा. पं. सदस्य जयराम पाटील, अनिल पावशे, सुरेश राठोड, तानाजी पाटील, उमेश पाटीलसह इतर सदस्यांनी जेसीबीच्या सहाय्याने ग्रा. पं. फंडातून कंग्राळी बुद्रुक-शाहूनगर खड्डेमय रस्ता उखडून खडी टाकून रोलर फिरवून रस्ता तात्पुरता खड्डेमुक्त करून वाहतुकीला सुरळीत करण्यात आला. त्यामुळे वाहनधारक, प्रवासी वर्ग व ग्रामस्थांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

Advertisement
Tags :

.