बेळगाव-बाची राज्य महामार्गाच्या दुरस्तीस प्रारंभ
आंदोलनाला यश : मंत्री लक्ष्मी हेब्बाळकरांकडून दखल : डांबरीकरण पावसाळ्यानंतर
वार्ताहर/हिंडलगा
बेळगाव-वेंगुर्ला या राज्य महामार्गाची त्वरित दुरुस्ती होण्यासाठी पश्चिम भागातील सात ग्रामपंचायतींमार्फत जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांना गुरुवार दि. 25 सप्टेंबर रोजी निवेदन देण्यात आले होते. याचे नेतृत्व युवा नेते मनोज प्र. पावशे यांनी केले होते. या आंदोलनात उचगाव, बेकिनकेरे, तुरमुरी, सुळगा, कुद्रेमनी, आंबेवाडी व हिंडलगा ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ यांनी सहभाग दर्शविला होता. पावसाळ्यात या रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाल्याने सर्वच वाहनचालक, पादचारी, दुचाकी व ट्रक्स यांची गैरसोय झाली होती. निवेदन देताना शासनाला पंधरा दिवसांचा अवधी दिला होता. याची तातडीने दखल जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, बेळगाव ग्रामीणच्या आमदार आणि महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी घेऊन दुरस्तीच्या कामास रविवारी चालना दिली.सुळगा (हिं.) येथे या रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामास रविवार दि. 29 रोजी सुऊवात करण्यात आली.
महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर व जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी प्रत्यक्ष या कामाच्या ठिकाणी भेट देऊन कामाची पाहणी केली. यावेळी बेळगाव ते कुद्रेमनी रस्त्यासाठी आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी रस्ता दुरस्तीसाठी प्रयत्न केले. परंतु तांत्रिक अडचणीमुळे बेळगाव ते बाची कर्नाटक हद्दीपर्यंतच दुरस्त करण्यास सुऊवात केली आहे. या राज्य मार्गावरून महाराष्ट्र, गोवा व कर्नाटक इथून मोठ्या प्रमाणात दळणवळण चालते. या ठिकाणी विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी, अभियंते शशिकांत कोलेकर, सोबरद तसेच युवराज कदम, मल्लेश चौगुले, भागाना नरोटे (सुळगा ग्रा.पं. उपाध्यक्ष) व इतर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. लागलीच रस्त्याच्या दुरस्तीला प्रारंभ केल्याने या भागातील नागरिकांतून समाधान व्यक्त केले जात आहे. हा रस्ता नव्याने करण्यासाठी शासनाकडून मंजुरी घेऊन लागलीच रस्ता करणार असल्याचे आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी उपस्थितांना सांगितले.