राज्य भाजपची पुनर्रचना
विविध नूतन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती : राज्य प्रधान कार्यदर्शीपदी पी. राजीव यांना संधी
प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्य भाजपची पुनर्रचना झाली असून प्रदेश भाजप युनिटसाठी नवीन पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेश उपाध्यक्ष, राज्य प्रधान कार्यदर्शी, राज्य सचिव, खजिनदार आणि 7 मोर्चांच्या अध्यक्षांची शनिवारी नियुक्ती करण्यात आली आहे. पदाधिकाऱ्यांच्या यादीत 6 आमदार, एक विधानपरिषद सदस्य, 10 माजी आमदारांना संधी देण्यात आली आहे.
माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांच्या सहा निकटवर्तीयांना आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष विजयेंद्र यांच्या दोन निकटवर्तीयांना जागा देण्यात आली आहे. काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या 17 नेत्यांपैकी भैरती बसवराज आणि 6 महिलांना संधी देण्यात आली आहे. नलिनकुमार काळातील उपाध्यक्षांपैकी एक असलेले एम. राजेंद्र यांना भाजप प्रदेश उपाध्यक्षपदी कायम ठेवण्यात आले आहे. तर कटील काळातील चार प्रधान कार्यदर्शी बदलण्यात आले आहेत.
भाजप प्रदेश उपाध्यक्षदी माजी मंत्री मुरुगेश निराणी, भैरती बसवराज, राजगौडा नायक, एन. महेश, अनिल बेनके, हरताळू हालप्पा, रुपाली नायक, डॉ. बसवराज केलगार, माळविका अविनाश आणि एम. राजेंद्र यांची निवड करण्यात आली आहे. तर राज्य प्रधान कार्यदर्शीपदी व्ही. सुनीलकुमार, पी. राजीव, एन. एस. नंदीश रेड्डी आणि जे. प्रीतम गौडा यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
भाजप राज्य कार्यदर्शीपदी शैलेंद्र बेलदाळे, डी. एस. अरुण, बसवराज मत्तीमोड, सी. मुनिराजू, विनय बिदरे, कॅप्टन ब्रिजेश चौट, शरणू तळ्ळीकेरी, ललिता अनापूर, डॉ. लक्ष्मी अश्विन गौडा, अंबिका हालिनायकर निवड केली आहे. भाजप राज्य खजिनदारपदी सुब्बनरसिंह, भाजप महिला मोर्चा राज्याध्यक्षपदी सी. मंजुळा, भाजप युवा मोर्चा राज्याध्यक्षपदी धीरज मुनिराजू, भाजप एसटी मोर्चा राज्याध्यक्षपदी बगारु हनुमंतू, भाजप एससी मोर्चा राज्याध्यक्षपदी एस. मंजुनाथ, भाजप ओबीसी मोर्चा राज्याध्यक्षपदी रघु कौटील्य, भाजप रयत मोर्चा राज्याध्यक्षपदी ए. एस. पाटील-नडहळ्ळी, भाजप अल्पसंख्याक मोर्चा राज्याध्यक्षपदी अनिल थामस यांची नियुक्ती करण्यात आली आहे.