शिरोली येथील वसतिगृह पुन्हा सुरू करा
पालकांची मागणी : लोकप्रतिनिधीनी शासनाकडे पाठपुरावा करणे गरजेचे : दुर्गम भागातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित : शासनाचे आडमुठे धोरण
खानापूर : तालुक्यातील भीमगड अभयारण्य क्षेत्रात असलेल्या शिरोली येथे असलेले विद्यार्थ्यांचे वसतिगृह कोणतीही पूर्वसूचना न देता यावर्षीच्या शैक्षणिक वर्षापासून बंद करण्यात आले आहे. त्यामुळे पश्चिम भागातील तसेच भीमगड अभयारण्य क्षेत्रातील दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित रहावे लागत आहे. तर काही विद्यार्थ्यांना लोंढा आणि खानापूर वसतिगृहात प्रवेश घेऊन आपले शिक्षण पूर्ण करावे लागत आहे. सरकारच्या आडमुठ्या धोरणामुळे दुर्गम भागातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. यासाठी तालुक्याच्या लोकप्रतिनिधीनी शासनाकडे पाठपुरावा करून शिरोली येथील बंद केलेले वसतिगृह पुन्हा सुरू करण्यासाठी पाठपुरावा करून वसतिगृह पुन्हा सुरू करावे, अशी मागणी भीमगड अभयारण्य क्षेत्रातील पालकांकडून होत आहे.
तालुक्याच्या पश्चिम भागातील भीमगड अभयारण्य क्षेत्रात नेरसा, गवाळी, पास्टोली, मेंडील, कृष्णापूर, पाली, हेम्माडगा, देगाव, तळेवाडी, डोंगरगाव, अबनाळी यासह इतर खेडी आहेत. या सर्व खेड्यांत पूर्व प्राथमिक शाळा आहेत. पुढच्या शिक्षणासाठी खानापूर किंवा शिरोली येथे यावे लागते. शिरोली येथे सरकारी माध्यमिक विद्यालय आणि प्राथमिक शाळा आहे. तसेच नेरसा येथे पूर्ण प्राथमिक शाळा असून उर्वरित ठिकाणी केवळ पूर्व प्राथमिक शाळा आहे. यामुळे सातवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झाले की, माध्यमिक शिक्षणासाठी या दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शिरोली किंवा खानापूर येथे यावे लागत होते. तत्कालीन आमदार अरविंद पाटील यांनी शासनाकडे पाठपुरावा करून शिरोली वसतिगृह मंजूर करून घेतले होते. त्यामुळे शिरोली, नेरसा दुर्गम भागातील विद्यार्थ्यांची सोय झाली होती. गेली दहा वर्षे या वसतिगृहात दुर्गम भागातील 50 ते 60 विद्यार्थी प्रवेश घेत होते. त्यामुळे विद्यार्थ्यांची शैक्षणिक सोय झाली होती.
अनेक विद्यार्थ्यांचा लेंढा येथील वसतिगृहात प्रवेश
शिरोली येथील प्राथमिक शाळेत 75 विद्यार्थी तर शासकीय माध्यमिक शाळेत 122 पटसंख्या आहे. माध्यमिक शाळेच्या मागील बाजूस राऊत यांच्या इमारतीत गेल्या दहा वर्षांपासून हे वसतिगृह चालविण्यात येत होते. मात्र यावर्षीच्या शैक्षणिक वर्षापासून अचानकपणे कोणतीही पूर्वसूचना न देता हे वसतिगृह बंद करण्यात आले आहे. त्यामुळे जवळपास 50 विद्यार्थ्यांना लेंढा वसतिगृहात प्रवेश घ्यावा लागला आहे. तर काही विद्यार्थी खानापूर येथे माध्यमिक शाळेत प्रवेश घेतलेला आहे. तर काही विद्यार्थ्यांनी शिक्षण अर्धवट सोडलेले आहे. त्यामुळे दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित रहावे लागत आहे.
महाविद्यालयीन विद्यार्थिनींसाठी वसतिगृह वर्गीकरणाचा घाट
याबाबत मागासवर्गीय वसतिगृह अधिकाऱ्यांना विचारले असता ते म्हणाले, शासनाच्या नियमानुसार प्रत्येक वसतिगृहात किमान पन्नास विद्यार्थ्यांनी प्रवेश घेणे गरजेचे आहे. मागीलवर्षी शिरोली येथील वसतिगृहात 45 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्याने हे वसतिगृह शासनाच्या नियमानुसार बंद करण्यात आले असून खानापूर येथे महाविद्यालयीन विद्यार्थिनींसाठी वसतिगृहाचे वर्गीकरण करण्यात येणार असल्याने तसा अहवाल शासनाला पाठवण्यात आला असल्याचे अधिकाऱ्यानी सांगितले.
न्यायालयीन प्रक्रियेमुळे जागा हस्तांतर रखडले
शिरोली येथे अरविंद पाटील यांच्या कार्यकाळात हे वसतिगृह सुरू करण्यात आले होते. या वसतिगृहासाठी शासनाकडून शिरोली ग्राम पंचायतीला पत्रव्यवहार करून 2 एकर जागा ग्राम पंचायतीने द्यावी, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांनी पत्राद्वारे केली होती. याची दखल घेऊन शिरोली ग्रा. पं.ने बामणवाडी येथील 2 एकर जागा वसतिगृहासाठी मंजूर केली होती. मात्र न्यायालयीन प्रक्रियेमुळे जागा हस्तांतर होऊ शकली नाही. त्यामुळे आतापर्यंत भाडेतत्त्वावर इमारत घेऊन हे वसतिगृह चालविण्यात येत होते.
50 विद्यार्थ्यांची अट शिथिल करावी
तालुक्यातील पश्चिम भाग हा अतिशय दुर्गम आणि पूर्णपणे जंगलाने व्यापलेला आहे. गेल्या काहीवर्षापूर्वी वनखात्याने भीमगड अभयारण्य तसेच व्याघ्र प्रकल्प राबवल्याने या भागातील जनजीवनावर बरेच निर्बंध घालण्यात आले आहेत. या भागात मोठ्याप्रमाणात पाऊस होतो. म्हणून हा भाग मलनाड म्हणून ओळखला जातो. मलनाड आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी शासनाने 50 विद्यार्थ्यांची अट शिथिल करावी आणि शिरोली येथील वसतिगृह पुन्हा सुरू करण्यात यावे, यासाठी लोकप्रतिनिधीनी शासनाकडे पाठपुरावा करावा, अशी मागणी या भागातील पालक आणि ग्रामस्थांतून होत आहे.