For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Cultural Kolhapur: तिसऱ्या श्रावणी सोमवाराची पर्वणी, रेणुकामातेचा पंचगंगा स्नानसोहळा

04:08 PM Aug 08, 2025 IST | Tarun Bharat Portal
cultural kolhapur  तिसऱ्या श्रावणी सोमवाराची पर्वणी  रेणुकामातेचा पंचगंगा स्नानसोहळा
Advertisement

पूर्ण शाकाहारी होतं आणि रोज नव्या सणासह श्रावणाचा आनंद साजरा करतात

Advertisement

By : प्रसन्न मालेकर 

कोल्हापूर : कोल्हापूर म्हटलं की रोज नवा उत्साह, रोज नवा सण. त्यातून सुरु महिना जर श्रावणाचा असेल तर या उत्साहाला, आनंदाला रोज एक नवं कारण मिळतं. एरवी मांसाहारासाठी प्रसिद्ध असणारे कोल्हापूर श्रावणात मात्र चुटपुटत का होईना, पूर्ण शाकाहारी होतं आणि रोज नव्या सणासह श्रावणाचा आनंद साजरा करतात.

Advertisement

अनेक कुळाचाराचे पालन

श्रावणी सोमवार म्हणजे तर एक अनोखी पर्वणी. सोमवारचा उपवास करणे आणि तो सोडायला परिचितांना आमंत्रण देणे, हा अनेकांच्या घरचा कुळाचार. मग याला जोडूनच कुळाचार म्हणून सुवासिनी, कुमारीका, मुंजा जेवायला घालणं, असे अनेक आचार महिनाभर घरोघरी सुरू असतात.

अशातच तिसरा सोमवार आला की याला आणखीनच गोड किनार प्राप्त होते. सौंदत्तीची यल्लमा अर्थात रेणुका हे जवळपास 90 टक्के कोल्हापूरचे आराध्य दैवत. या जगदंबेचं ओढ्यावर असलेलं प्राचीन मंदिर म्हणजे भाविकांचे श्रद्धास्थान. असे मानाचे सर्व जग सकाळी साडेनऊ दहाच्या सुमाराला वाजतगाजत पंचगंगेकडे निघतात.

ओढ्यावरील मंदिरातून निघालेल्या पालखीला मिरजकर तिकटी येथे ओढ्यावरचा आणि रविवार पेठेतला जग भेटतात. हे हे सर्वजण मिळून कसबा गेटला गंगावेशच्या जगाला भेटतात आणि इथून पुढे वाजत गाजत जामदार क्लबला जातात. पूर्वी हा सोहळा शिवसागरमध्ये जमायचा. परंतु पावसापाण्याचे दिवस आणि पंचगंगेची अनिश्चित पातळी गृहीत धरता सध्या जग आणि पालखी जामदार क्लबमध्ये विसावतात.

अभिषेकाला पंचगंगेचे पाणी

जोगती-पुजारी वाजतगाजत नदी तीरावर जातात. नदीची पूजा करून पाणी भरून आणतात आणलेल्या पाण्याने देवीचा अभिषेक होतो. पुन्हा नव्याने सादर केला जातो. पालखी, जग फुलांनी शृंगारला जातो. उजळलेल्या आरत्यांनी चारी जगाचे मानकरी आपापल्या जगांसह इतर जगाची आरती करतात आणि पंचगंगेची आरती करण्यासाठी घाटाकडे मार्गस्थ होतात. काठावर पुन्हा एकदा गंगामाईची पूजा करून आरती केली जाते. उदोकाराबरोबर चांगभलं चाही गजर होतो आणि आरत्या पुन्हा देवी जवळ येतात. आता देवीच्या प्रस्थानाची वेळ होते.

भक्तांच्या पाहुणचाराचा स्वीकार

वाजंत्रीच्या निनादात हलगी, घुमकं, सुतीचौंडक या सगळ्याच्या आवाजात सजलेले जग आणि पालखी आपल्या स्थानाकडे मार्गस्थ होते. पण आता मात्र देवी मंदगतीने भक्तांच्या पाहुणचाराचा स्वीकार करत त्यांना आशीर्वाद देत आपला मार्गक्रमण करत असते.

शुक्रवार पेठ, पापाची तिकटी, गुजरी या रस्त्याने जग आणि पालखी भवानी मंडपात येतात. इतर सर्व मंदिरांप्रमाणेच करवीर छत्रपतींचा आश्रय ओढ्यावरील रेणुका मंदिरालाही आहे. म्हणूनच ते भवानी पुढे बसून भेटी घेतात. काही काळ पारंपरिक पदांनी रेणुका-जगदंबा आळवली जाते.

रेणुका-गंगा भगिनी भेट

श्रावण महिन्यातील गंगास्नान हा या सोहळ्याचा मुख्य हेतू. देवी जगदंबा म्हणजे साक्षात पार्वतीचा अवतार. ते प्रिय भगिनीला म्हणजे गंगेला भेटायला जाते. देवीबरोबरच गंगेचे स्नान करून भक्तांनाही अनोखं पुण्य प्राप्त होतं. ही संकल्पना. पण हा सोहळा वेगळ्या कारणासाठी वैशिष्ट्यापूर्ण असतो तो म्हणजे परंपरेने रेणुकेची पूजा करणाऱ्या जोगती समाजाकडे वैयक्तिक आनंदाचे, सणाचे प्रसंग फार कमी.

नटणं सजणं हे किती जरी आवडत असले तरी आयुष्यात साजरे करावे असे क्षण फार कमी. त्यामुळेच देवीलाच आपलं आयुष्य वाहिलेले हे लोक यानिमित्ताने नटतात सजतात. आनंद करतात मनसोक्त नाचतात. (अर्थात काही थिल्लर आणि आंबटशौकीन लोकांमुळे याला गालबोट लागते, पण नाईलाज) जोगत्यांच्या, किन्नरांच्या तापलेल्या वणव्यासारख्या आयुष्यात तिसऱ्या सोमवारची ही श्रावणसर एखाद्या फुंकरीसारखी असते हेच विशेष.

पंचगंगा स्नानाचे महत्त्व

रेणुका, अर्थात आदिशक्ती जगदंबा. जमदग्नी ऋषींची पतीव्रता सती. अशी ही रेणुका, तिच्या दिव्य चरित्रामुळे लोकमानसात प्रतिष्ठित आहे. श्रावणामध्ये गंगास्नानाला फार महत्त्व आहे अनेक घरात श्रावण महिन्यात एकदा तरी पंचगंगेचं स्नान करण्याची पद्धत आजही पाहायला मिळते.

याला ही जगदंबा यल्लम्मा पण अपवाद नाही. दरवर्षी श्रावणाच्या तिसऱ्या सोमवारी ओढ्यावरची रेणुका वाजत गाजत पंचगंगेच्या स्नानाला निघते. (मात्र तिसऱ्या सोमवारी पौर्णिमा आली तर चौथ्या सोमवारी) ओढ्यावरच्या मंदिरातून देवीची पालखी शांताबाई सोनाबाई जाधव यांचा जग, रविवार पेठेतला बायकाबाई चव्हाण यांचा जग, गंगावेशेतला लक्ष्मीबाई जाधव यांचा जग आणि गेल्या तीन दशकात उपनगरातील प्रसिद्ध असलेल्या रेणुकानगर येथील पाचगाव मंदिरातील देवीची पालखी आणि बेलबागेतील आळवेकर जग.

राजघराण्याकडून मानसन्मान

परंपरेप्रमाणे राजघराण्याकडून देवी आणि पुजाऱ्यांचा मानसन्मान केला जातो. त्यानंतर पुन्हा हे जग सकाळप्रमाणे आपापल्या स्थानाला मार्गस्थ होतात. एव्हाना संध्याकाळ होत आलेली असते. रेणुकेची पालखी सर्व जगांना आपापल्या स्थानाला निरोप देऊन मंदिरात परत येते. आल्यानंतर मंदिराच्या पाच प्रदक्षिणा करून सदरेवर विसावते.

Advertisement
Tags :

.