भंडाऱ्याच्या उधळणीत किणये येथे रेणुकादेवी यात्रा
परडी भरण्याच्या कार्यक्रमाला भाविकांची अलोट गर्दी : भंडाऱ्याची उधळण, उदं गं आई उदं...चा जयघोष
वार्ताहर/किणये
भंडाऱ्याची उधळण, उदं गं आई उदं...चा जयघोष करत किणये येथे मंगळवारी रेणुकादेवी यात्रा मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात पार पडली. यावेळी परड्या भरण्याच्या कार्यक्रमाला भक्तांची अलोट गर्दी झाली. भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. शुक्रवार दि. 30 जानेवारी रोजी किणये गावातील भाविक यल्लम्मा डोंगराकडे रवाना झाले होते. यावेळी गावातील सुमारे 25 खासगी टेम्पोतून भाविक यल्लम्मा डोंगरावर गेले. यल्लम्मा डोंगरावर रविवार दि. 1 फेब्रुवारी रोजी गावच्या वतीने सामूहिक पद्धतीने परड्या भरण्याचा कार्यक्रम झाला. सोमवार दि. 2 रोजी हे भाविक किणये येथे आले. मंगळवारी सकाळी किणये गावाजवळ असलेल्या शिवारात रेणुकादेवी यात्रा भरविण्यात आली. गावच्या वतीने परड्या भरण्याचा कार्यक्रम झाला. भंडाऱ्याची उधळण करण्यात आली. सर्वजण उदं गं आई उदं... असा जयघोष करताना दिसले. भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यात्रेनिमित्त या परिसरात आईक्रीम व विविध प्रकारचे स्टॉल उभारण्यात आले होते.