भाड्याने घेतात ‘पती’
भारतात पुरुषांची संख्या महिलांपेक्षा अधिक आहे. अशी स्थिती जगातील अनेक देशांमध्ये आहे. तथापि, काही देश असे आहेत, की तेथे महिलांची संख्या पुरुषांपेक्षा अधिक असते. काही देशांमध्ये ती इतकी अधिक आहे, की विवाहासाठी महिलांना पुरुष मिळत नाहीत. युरोपमधील लाटव्हिया या देशात अशी स्थिती आहे. त्यामुळे या देशात एक अनोखी प्रथा जन्माला आली आहे. येथे तरुणी किंवा महिला तासांच्या हिशेबाने भाडे देऊन ‘पती’ घेतात. असे पती पुरविणाऱ्या संस्थाही या देशात असल्याच बोलले जाते. त्यामुळे एक पुरुषाला अनेक पत्नींची ‘सेवा’ भाडोत्री पद्धतीने करावी लागले. या महिला आपल्या भाड्याने घेतलेल्या पतीकडून घरची कामे किंवा स्वत:ची व्यक्तीगत कामेही करुन घेतात, असे दिसून येते.
या देशात पुरुषांची संख्या सातत्याने कमी होत आहे. त्यामुळे सामाजिक असंतुलनाची स्थिती निर्माण झाली आहे. या देशातील महिला पुरुषांपेक्षा अधिक उच्चशिक्षित, प्राकृतिकदृष्ट्या स्वस्थ, अधिक आर्थिक प्राप्ती करणाऱ्या आणि अधिक आयुष्यमान असतात, असेही पहावयास मिळते. पुरुषांची संख्या कमी असल्याने या महिलांना पती मिळण्यात अडचणी येतात. म्हणून त्यांनी हा मार्ग शोधून काढला आहे. या देशातील काही महिला पतीच्या शोधार्थ विदेशी जातात. विदेशातील पुरुषाशी विवाह करतात आणि तेथेच स्थायिक होतात. तरीही या देशातील महिलांची संख्या पुरुषांपेक्षा किमान 30 टक्के अधिक असल्याही माहिती दिली जाते. येथे पती हा माणूस न समजला जाता तो एक ‘वस्तू’ समजला जातो. पती भाड्याने पुरविणाऱ्या संस्था तशी जाहीरातही करतात. अशा भाडोत्री पतींना तेथे ‘मेन विथ गोल्डन हँडस्’ असे संबोधन आहे. महिला पती पुरुषाचे बुकिंग ऑनलाईन करु शकतात. पती म्हणून भाड्याने गेल्यानंतर या पुरुषांना अशा महिलांची अनेक कामे करावी लागतात. घरातील नळ बिघडला असेल तर तो दुरुस्त करणे, टीव्ही बसवून देणे, घरातील फर्निचर असेंबल करणे किंवा साफ करणे, घरातील अन्य छोटी मोठी दुरुस्तीची कामे करणे आदी कामे करण्याची वेळही या पुरुषांवर येते. जे पुरुष अशी कामे करण्यात कुशल असतात. त्यांना अर्थातच, अधिक भाडे मिळते, किंवा त्यांना मागणी मोठी असते. असा ‘पती’ आज्ञाधारक आणि सुस्वभावी असेल, तर त्याला महिलेकडून मोठा मानही मिळतो.