गाळ्यांची थकबाकी 75 लाख, वसुली 60 हजार
खानापूर नगरपंचायतीच्या दुकानगाळ्यांचे भाडे थकीत : केवळ भाजीमार्केटच्या भाडेकरुंवर कारवाई
खानापूर : खानापूर नगरपंचायतीच्या शहरातील 65 दुकानगाळ्यांचे गेल्या काही वर्षापासून भाडे थकलेले असून जवळपास 75 लाखाच्यावर भाडे थकलेले आहे. नगरपंचायतीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सोमवारी थकीत भाडेवसुलीसाठी कारवाई हाती घेतली आहे. भाजीमार्केटमधील दुकानगाळ्यांचे 60 हजार भाडे वसूल करण्यात आले आहे. मात्र शहरातील दुकान गाळेधारकांचे 75 लाख रुपये भाडे थकलेले असूनदेखील नगरपंचायतीने याबाबत ठोस कारवाई हाती घेतलेली नाही.
शहरात नगरपंचायतीने जवळपास 64 दुकानगाळे भाडेतत्त्वावर दिले आहेत. यात नगरपंचायतीच्यासमोर 8, मराठी शाळेसमोर 5, कन्नड शाळेसमोर 8, बसस्टँडसमोर 12 आणि भाजीमार्केटमध्ये लहान 24, बाजारपेठ चावडी येथील 6 अशी एकूण 64 दुकाने आहेत. हे दुकानगाळे नगरपंचायतीने भाडेतत्त्वावर दिलेले आहेत. मात्र गेल्या काही वर्षापासून या गाळ्यांचे भाडेच वसूल करण्यात आलेले नाही. याबाबत नगरपंचायतीने साफ दुर्लक्ष केले असून भाडेवसुलीकडे कानाडोळा केलेला आहे.
आतापर्यंत 75 लाखाच्या पुढे दुकानगाळ्यांचे भाडे थकलेले आहे. मात्र याबाबत नगरपंचायतीने कोणताही क्रम घेतलेला नाही. तसेच गाळेधारकांनी पोटभाडेकरू ठेवून जादा भाडे आकारण्यात येत आहे. असे असूनदेखील नगरपंचायतीचे भाडे मात्र थकवलेले आहे. नगरपंचायतीने यापूर्वीही भाडेवसुलीचा फार्स केला होता. मात्र भाडेवसुली झालेली नव्हती. सोमवारी भाजीमार्केटमधील छोट्या दुकानगाळ्यांच्या मालकांकडून भाडेवसुलीसाठी तगादा लावून गेल्या अनेक वर्षापासून थकलेले भाडे वसूल करण्यासाठी प्रयत्न केल्यानंतर 60 हजार रुपये भाडेवसुली करण्यात आली आहे. मात्र अद्याप दुकानगाळे भाडेकरुंकडून मोठ्या प्रमाणात भाडे थकलेले असूनदेखील नगरपंचायतीने याबाबत ठोस कारवाई हाती घेतली नाही. याची चर्चा शहरात सुरू आहे.
फळ भाजीमार्केटचेही भाडे थकीतच
यात्राकाळात भाजीमार्केटमध्ये फळ दुकानदारांना बसवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या ठिकाणी फळ दुकानदारांनी आपली दुकाने थाटली आहेत. मात्र या ठिकाणी चालत जाणेही कठीण झाले आहे. तर पुन्हा फळ दुकानदारांनी आपली दुकाने मुख्य रस्त्यावर लावण्यास सुरुवात केली आहे. तसेच भाजीमार्केटच्या नावाखाली छोटेछोटे दुकानगाळे तयार केले आहेत. आणि हे भाडेतत्त्वावर देण्यात आले आहेत. मात्र या गाळ्यात एकही भाजीविक्रेता बसत नाही. सर्व भाजीविक्रेते हे मुख्य रस्त्यावरच बसत आहेत. त्यामुळे या भाजीमार्केटचे भाडेही थकलेले आहे.
भाजीमार्केटबाबत नगरपंचायतीने योग्य निर्णय घेऊन हेस्कॉमच्या मागील बाजूस निंगापूर गल्लीपर्यंत योग्य नियोजन केल्यास फळमार्केट आणि भाजीमार्केटसाठी दुकानगाळे तयार होऊ शकतात. मात्र याबाबत नगरपंचायतीकडून कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. भाडेवसुलीसाठी नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनी निव्वळ भाडेवसुलीचा फार्स न करता थकीत भाडे वसूल करून शहराच्या विकासाचे नियोजन करणे गरजेचे आहे. भाजीमार्केट आणि फळमार्केटचे नियोजन झाल्यास मुख्य रस्त्यावरील रहदारीच्या अडचणीवर मार्ग निघणार आहे. यासाठी भाजीमार्केटचे योग्यप्रकारे नियोजन करणे गरजेचे आहे.