रेंट अ कॅब, बाईकला यापुढे परवाना मिळणार नाही
वाहतूक खात्याकडून अधिसूचना जारी
पणजी : गोव्यात आता रेंट-अ-कार आणि रेंट-अ-बाईकला परवाना मिळणार नाही अशी अधिसूचना वाहतूक खात्याने जारी केली आहे. रस्ता सुरक्षा, वाहतुकीची कोंडी व अधिनियामक तरतुदीचे पालन याबाबत विचार करून जनतेच्या हिताच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. सर्वसाधारण जनतेच्या माहितीसाठी अधिसूचनेद्वारे कळविण्यात आले आहे की, राज्य वाहतूक प्राधिकरणाच्या 24 फेब्रुवारी 2025 रोजी घेण्यात आलेल्या बैठकीत रेंट-अ-कॅब योजना 1989 च्या अंतर्गत पुढील सूचनेपर्यंत कोणताही नवीन रेंट-अ-बाईक तसेच रेंट-अ-कार परवाना जारी न करण्याचा निर्णय घेतला आहे.
भाडेपट्टीवरील वाहने पर्यटकांनी स्वत: चालवून होणाऱ्या अपघातांची संख्या वाढत आहे. तसेच पर्यटकांच्या बेफाम व निष्काळजीपणे वाहने चालविण्याची अनेक उदाहरणे आहेत. तसेच पर्यटकांनी मद्याच्या प्रभावाखाली वाहने चालवण्याच्या प्रकरणामुळे अपघातांची संख्या वाढत आहे. त्यामुळे गंभीर जखमी होणे तसेच मृत्यूंची संख्या वाढत आहे. या सगळ्या प्रकारावर आळा घालण्यासाठी वरील निर्णय घेण्यात आला आहे, असे अधिसूचनेत म्हटले आहे.
त्यामुळे रेंट-अ-कॅब, बाईक परवानगीसाठी कोणताही नवीन अर्ज कोणी कऊ नये, कारण असे अर्ज या स्तरावर पुढे प्रक्रियान्वित केले जाणार नाहीत. राज्यातील वाहन अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. त्यात अधिकाधिक रेंट-अ-कार आणि रेंट-अ-बाईकचा सहभाग असतो. नियमितपणे होणाऱ्या अपघातांमुळे सर्वसामान्य लोकांना जीव गमवावा लागतो. वाहतूक पोलिस वाहतूक खात्याचे उल्लंघन करणाऱ्या रेंट-अ-कार तसेच रेंट-अ-बाईक चालकांवर कारवाई करीत असतात मात्र अपघातांची संख्या वाढतच असते.
पन्नास टक्क्यांपेक्षा अधिक अपघात झालेत रेंट-अ-कॅब, बाईकमुळे
2024 सालात वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी 22 हजार 764 रेंट-अ-कार आणि रेंट-अ-बाईक चालकांना दंड देण्यात आला आहे. त्यात 8 हजार 45 रेंट-अ-कार चालकांचा समावेश आहे तर 14 हजार 781 रेंट-अ-बाईकचालकांचा समावेश आहे. 2025 सालातील दोन महिन्यात 5 हजार 10 रेंट-अ-कार आणि रेंट-अ-बाईक चालकांना दंड देण्यात आला आहे. त्यात 1 हजार 381 रेंट-अ-कार चालकांचा समावेश आहे तर 3 हजार 292 रेंट-अ-बाईक चालकांचा समावेश आहे. राज्यातील रेंट-अ-कॅब योजना तात्पुरती स्थगित करण्याचा निर्णय वाहतूक खात्याने घेतला आहे.