प्रख्यात कादंबरीकार एस. एल. भैरप्पा यांचे निधन
कन्नड साहित्य क्षेत्रावर शोककळा
प्रतिनिधी/ बेंगळूर
पद्मभूषण पुरस्कार विजेते प्रख्यात कादंबरीकार, तत्त्वज्ञानी आणि कथाकार डॉ. एस. एल. भैरप्पा (वय 94) यांचे बुधवार 24 रोजी हृदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. बेंगळूरच्या राजाजीनगर येथील राष्ट्रोत्थान हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे कन्नड साहित्य क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. त्यांच्या पार्थिवावर गुरुवारी हासन जिल्ह्यातील संतेशिवर येथील मूळ गावी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
गेल्या काही दिवसांपासून साहित्यिक एस. एल. भैरप्पा आजारी होते. सहा महिन्यांपूर्वी आजारी असल्याने त्यांना बेंगळूरमधील हॉस्पिटमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यांची प्रकृती उत्तम होती. मात्र, मागील तीन दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती खालावल्याने पुन्हा बेंगळुरातील राष्ट्रोत्थान हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान हृदयविकारामुळे त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी सरस्वती, मुलगे रविशंकर आणि उदयशंकर असा परिवार आहे.
संतेशिवर लिंगण्णय्या भैरप्पा यांनी कन्नडमधून रचलेल्या अनेक कादंबऱ्या व इतर साहित्याचे इंग्रजी व इतर भारतीय भाषांमध्ये अनुवाद झाले आहेत. अनेक वृत्तपत्रांमधून त्यांनी स्तंभलेखनही केले. त्यांचा जन्म हासन जिल्ह्याच्या चन्नरायपट्टण येथील संतेशिवर येथे 20 ऑगस्ट 1931 रोजी झाला. त्यांच्या वयाच्या पाचव्या वर्षीच आईचे प्लेगमुळे निधन झाले. स्वत: काबाडकष्ट करत त्यांनी उच्च शिक्षण घेतले. म्हैसूर विद्यापीठातून दोन सुवर्णपदकांसह त्यांनी तत्त्वज्ञान विभागातून एम. ए. पदवी मिळविली. बडोद्यातील सयाजीराव विद्यापीठात सादर केलेल्या ‘सत्य आणि सौंदर्य’ या प्रबंधाला पीएचडी मिळाली. हुबळीतील काडसिद्धेश्वर कॉलेज, गुजरातमधील सरदार वल्लभभाई पटेल विद्यापीठ आणि दिल्लीतील राष्ट्रीय शिक्षण व प्रशिक्षण संस्थेत (एनसीईआरटी) त्यांनी काम केले. त्यानंतर ते साहित्य क्षेत्रात उतरले. ‘भित्ती’ नावाचे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध झाले.
त्यांच्या वंशवृक्ष, तब्बलीयु निनादे मगने, मतदान या कादंबऱ्यांवर चित्रपट निघाले. या चित्रपटांना अनेक पुरस्कारही मिळाले. ‘वंशवृक्ष’ या कादंबरीला 1966 मध्ये राज्य साहित्य अकादमीचा पुरस्कार तर 1975 मध्ये ‘दाटू’ या कादंबरीला केंद्रीय साहित्य अकादमीचा तर 1966 मध्ये कन्नड साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला होता. त्यांना 2023 मध्ये पद्मभूषण, 2014 मध्ये डॉ. बेटगेरी कृष्णमूर्ती पुरस्कार, 2011 मध्ये नाडोज पुरस्कार प्राप्त झाला. 2010 मध्ये सरस्वती सम्मान पुरस्कार आणि 2007 मध्ये एन. टी. आर. राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला होता. 2019 मध्ये जगप्रसिद्ध म्हैसूर दसरोत्सवाचे उद्घाटन करण्याचा मान त्यांना देण्यात आला होता.
कादंबऱ्यांमुळे देशभरात नावलौकिक मिळविलेल्या एस. एल. भैरप्पा यांच्या निधनामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी, माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा, मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा, केंद्रीय मंत्री एच. डी. कुमारस्वामी, भाजप प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र यांच्यासह अनेकांनी शोक व्यक्त केला.
भैरप्पा यांच्या कादंबऱ्या
भीमकाय, बेळकू मुडीतू, धर्मश्री, दूर सरिदरू, निरकरण, ग्रहण, दाटू, अन्वेषण, पर्व, नेले, साक्षी, अंचू, तंतू, सार्थ, आवरण, कवलू, यान, उत्तरकांड, मतदान, वंशवृक्ष, जलपात, नायी नेरळू, तब्बलीयू निनादे मगने, गृहभंग या कादंबऱ्यांची रचना भैरप्पा यांनी केली. सत्य मत्तू सौंदर्य, संदर्भ : संवाद, साहित्य मत्तू प्रतिक, कथे मत्तू कथावस्तू या तत्त्वशास्त्रावरील साहित्याची रचनाही भैरप्पा यांनी केली.