प्रसिद्ध नेपाळी गिर्यारोहक निर्मल पुर्जा यांचे निधन
गिलगिट-बाल्टिस्तानमध्ये हिमस्खलनात बळी
वृत्तसंस्था
काठमांडू
पाकिस्तानव्याप्त गिलगिट-बाल्टिस्तानमध्ये हिमस्खलनात प्रसिद्ध गिर्यारोहक निर्मल पुर्जा यांचे निधन झाले. त्यांच्या ‘एलिट एक्सपेडिशन्स’ या गिर्यारोहण कंपनीने या घटनेला दुजोरा दिला आहे. निर्मल 30 जुलै रोजी काराकोरम प्रदेशातील 8,051 मीटर उंचीच्या ब्रॉड पीकवर चढाई करत होते. याचदरम्यान अंदाजे 7,000 मीटर उंचीवर हिमस्खलन झाल्यामुळे गिर्यारोहकांना प्राण गमवावे लागले होते. निर्मल यांच्यासह सहा नेपाळी नागरिकही होते.
नेपाळ आणि जगभरातील गिर्यारोहकांमध्ये ‘निम्स दाई’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निर्मल पुर्जा यांनी 2019 मध्ये ‘प्रोजेक्ट पॉसिबल’ सुरू केला होता. अवघ्या सात महिन्यांत जगातील 8,000 मीटरपेक्षा जास्त उंचीची सर्व 14 शिखरे सर करण्याचे त्यांचे ध्येय होते. त्यावेळी हे जवळजवळ अशक्य मानले जात होते. निर्मल पुर्जा यांनी केवळ सहा महिने आणि सहा दिवसांत हा पराक्रम करून, दक्षिण कोरियाचे गिर्यारोहक किम चांग-हो यांच्या नावावर असलेला जवळपास आठ वर्षे जुना जागतिक विक्रम मोडला होता.