विख्यात भूगर्भ शास्त्रज्ञ डॉ. एम. के. प्रभू यांचे निधन
प्रतिनिधी | सिंधुदुर्ग
ओरोस येथील रहिवासी व आंतरराष्ट्रीय किर्तीचे भूगर्भशास्त्रज्ञ डॉ. एम. के. प्रभू यांचे बुधवार दिनांक 18 फेब्रुवारी रोजी मध्यरात्रीच्या सुमारास ह्रदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी , मुलगा, मुलगी, सून, जावई व नातवंडे असा मोठा परिवार आह भूगर्भशास्त्र या विभागात डॉ. एम. के. प्रभू यांचे नाव साऱ्या महाराष्ट्राला माहीत आहे. कोयना येथे झालेल्या प्रलयकारी भूकंपानंतर सदर भूकंपाबाबत अभ्यास करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने तज्ञ भूगर्भ शास्त्रज्ञांची जी समिती नेमली होती त्या समितीत एक महत्त्वपूर्ण सदस्य म्हणून डॉ. प्रभू सहभागी होते. कॅनडा मध्ये राहून त्यांनी आपलं पी . एच. डी. चं शिक्षण पूर्ण केलं होतं. त्याठिकाणी गोल्ड माईन शोधून देण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता. भारत सरकारच्या मायनिंग डिपार्टमेंट मध्ये देखील त्यांनी वरिष्ठ अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळली होती. त्यानंतर कोल्हापूर विद्यापीठाच्या जीऑलॉजी विभागाचे प्रमुख म्हणून देखील त्यांनी महत्वपूर्ण जबाबदारी बजावली होती. महाराष्ट्र शासनाला देखील भूगर्भातील खनिजे शोधून देण्यामध्ये त्यांचा महत्वपूर्ण वाटा होता. अमेरिकेच्या अपोलो या चांद्र मोहिमेच्यावेळी अंतराळवीरांनी चंद्रावरून जी दगड, माती पृथ्वीवर आणली होती, त्या दगड व मातीवर संशोधन व अभ्यास करण्याची महत्वपूर्ण संधी डॉ. प्रभू यांना मिळाली होती. भूगर्भ शास्त्रातले 'भिष्माचार्य' म्हणून त्यांना ओळखले जायचे . त्यांच्या मार्गदर्शनाखाली आजपर्यंत अनेक विद्यार्थी तयार झाले. जे शासनाच्या भूगर्भ विभागातील अनेक महत्वपूर्ण जबाबदाऱ्या सांभाळत आहेत. निवृत्ती पश्चात ओरोस येथे स्थायिक झालेल्या डॉ .एम. के. प्रभू यांचं निधन हे अनपेक्षित आणि चटका लावणारं असच म्हणावं लागेल. डॉ . प्रभू यांच्या निधनाने भूगर्भशास्त्रातला एक चालता बोलता 'एन्सायक्लोपीडिया' कायमस्वरूपी बंद झाला , अशी प्रतिक्रिया संपूर्ण जिल्ह्यातून व्यक्त होत आहे .