जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालयाची डागडुजी
बेळगाव : जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालयाची इमारत जीर्ण झाली असल्याने कार्यालयाचा काही भाग नूतनीकरण करण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. जुन्या कौलारू इमारतीला नवीन रंग देण्याचा प्रयत्न शिक्षण विभागाकडून केला जात आहे. त्यामुळे या इमारतीतील सर्व कार्यालये इतर इमारतीत हलवण्यात आली आहेत. पावसाळ्यात गळती लागल्याने छत्री घेऊन बसलेले शिक्षण विभागाचे कर्मचारी हे चित्र अनेक वेळा पहायला मिळाले. पावसाळ्याच्या दिवसात दुरुस्ती करणे अशक्य असल्याने शिक्षण विभागानेही असमर्थता व्यक्त केली होती. जिल्हा पंचायतीचे सीईओ राहुल शिंदे यांनीही इमारतीची पाहणी करून दुरुस्तीसाठीचा राखीव निधी देण्याचे आश्वासन दिले होते. सध्या पाऊस थांबल्याने इमारतीच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. जिल्हा शिक्षणाधिकारी लिलावती हिरेमठ यांच्या सूचनेनुसार इमारतीचा काही भाग दुरुस्त केला जात आहे. जुन्या कौलारू इमारतीला प्लास्टर तसेच नवे रूप देऊन गळती रोखण्याचा प्रयत्न करणार आहेत. यामुळे इमारतीतील कार्यालये शेजारच्या इमारतीत तात्पुरत्या स्वरुपात हलवली आहेत. पुढील काही दिवस ही कार्यालये नवीन जागेतच चालविली जाणार आहेत.