136 वर्षांच्या रेल्वेस्थानकाचे नूतनीकरण
वृत्तसंस्था / भिलई
केंद्र सरकारच्या अमृत भारत स्थानक योजनेअंतर्गत छत्तीसगडमधील भिलई येथील 136 वषे जुन्या असणाऱ्या रेल्वे स्थानकाचे नूतनीकरण करण्यात येत आहे. हे स्थानक भारतातील सर्वात जुन्या रेल्वेस्थानकांपैकी एक आहे. या स्थानकाचा कायापालट करण्यात येत असून येथे नव्या सुविधा निर्माण करण्यात येत आहेत.
या स्थानकाची स्थापना 1888 मध्ये ब्रिटीशांच्या काळात झाली होती. तेव्हापासून या स्थानकाचे नूतनीकरण झाले नव्हते. केवळ डागडुजी करुन कामचलावू सुधारणा करण्यात आल्या होत्या. तथापि, आता हे स्थानक नव्या युगात प्रवेश करत आहे. सध्याच्या काळानुसार आवश्यक त्या सुधारणा या स्थानकात करण्यात येत आहेत. स्वच्छ पिण्याचे पाणी, वातानुकुलीत प्रतीक्ष कक्ष, बागबगीचा, रंगरंगोटी, फलाट आणि परिसराची स्वच्छता आदी कामे पूर्ण करण्यात आली आहेत. स्थानकाचा विस्तारही करण्यात येत असून अधिक गाड्या येथे येण्याच्या आणि येथून जाण्याच्या दृष्टीने हे स्थानक सज्ज करण्यात येत आहे. प्रवाशांना पावसाचा त्रास होऊ नये म्हणून फलाटांवर छत बसविण्यात आले आहे. या स्थानकाचा इतिहास लोकांना समजावा म्हणून एक संग्रहालयाचीही योजना करण्यात आली आहे, अशी माहिती स्थानकाचे प्रमुख संजीव कुमार यांनी दिली.