For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

रशियावर पुन्हा तीव्र हल्ले

06:51 AM Sep 21, 2026 IST | Tarun Bharat Portal
रशियावर पुन्हा तीव्र हल्ले
Advertisement

युक्रेनने 1,600 हून अधिक ड्रोन डागले : दोघांचा मृत्यू : एका तेल शुद्धीकरण कारखान्याला आग

Advertisement

वृत्तसंस्था/ मॉस्को

संसदीय निवडणुकांच्या अंतिम दिवशी युक्रेनने रशियावर आतापर्यंतचा सर्वात मोठा हवाई हल्ला केला. रशियाच्या विविध भागांतून रात्रभरात 1,600 हून अधिक ड्रोन डागण्यात आले. यापैकी सुमारे 450 ड्रोन थेट मॉस्कोच्या दिशेने डागण्यात आल्यामुळे शहरात मोठ्या प्रमाणावर विध्वंस झाला. या विनाशकारी हल्ल्यात दोन जण ठार झाले असून मॉस्कोच्या मुख्य तेल शुद्धीकरण कारखान्याचे मोठे नुकसान झाले.

Advertisement

मॉस्कोमध्ये शनिवारी मध्यरात्रीनंतर झालेल्या हल्ल्याने दहशत पसरली. मॉस्कोचे महापौर सर्गेई सोब्यानिन यांनी याला राजधानीवरील सर्वात मोठा ड्रोन हल्ला म्हटले आहे. या हल्ल्यात मॉस्कोच्या प्रमुख तेल शुद्धीकरण कारखान्याच्या मुख्य प्रकल्पाचे मोठे नुकसान झाले. शुद्धीकरण कारखान्यातून काळ्या धुराचे मोठे लोट बाहेर पडताना दिसत होते. या हल्ल्याचा परिणाम राजधानीच्या निवासी भागांतही जाणवला. एक युक्रेनियन ड्रोन 21 मजली निवासी इमारतीवर कोसळल्याने इमारतीला आग लावली. यासंबंधीची माहिती मिळताच आपत्कालीन पथकांनी घटनास्थळी धाव घेत लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढले.

हल्ल्यात दोघांचा मृत्यू

मॉस्को प्रदेशाचे गव्हर्नर आंद्रेई वोरोब्योव्ह यांच्या म्हणण्यानुसार, ड्रोन हल्ल्यात ढिगाऱ्याखाली चिरडून एका 44 वर्षीय महिलेचा आणि एका 74 वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला. या घटनेत अनेक जण जखमीही झाले. एका निवासी इमारतीला आग लागल्यानंतर बचाव पथकांनी सुमारे 70 मुलांसह अंदाजे 400 लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढले. जखमींना जवळच्या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

झेलेन्स्की यांच्याकडून हल्ल्याचे लक्ष्य उघड

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी सोशल मीडियाद्वारे हल्ल्याची माहिती दिली. या कारवाईत युक्रेनियन बनावटीच्या फ्लेमिंगो आणि पेलिकन क्षेपणास्त्रांनी सुसज्ज असलेल्या ड्रोनचा वापर करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.  रशियाच्या तेल, ऊर्जा आणि लॉजिस्टिक्स सुविधा हे हल्ल्याचे मुख्य लक्ष्य असल्याचा दावा झेलेन्स्की यांनी केला. रशियाची युद्धक्षमता आर्थिकदृष्ट्या कमकुवत करणे हा अशा हल्ल्यांचा उद्देश आहे. युक्रेन बऱ्याच काळापासून लांब पल्ल्याच्या ड्रोन आणि क्षेपणास्त्रांद्वारे रशियामधील लष्करी आणि सामरिक प्रतिष्ठानांना लक्ष्य करत आहे. तथापि, या हल्ल्याशी संबंधित सर्व दाव्यांची स्वतंत्र पुष्टी अद्याप उपलब्ध नाही.

1,100 ड्रोन पाडल्याचा रशियाचा दावा

युक्रेनच्या हवाई हल्ल्यापासून संरक्षण करताना रशियाच्या हवाई संरक्षण युनिट्सनी 1,100 हून अधिक ड्रोन नष्ट केले आहेत, असे रशियन संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे. क्रिमिया आणि काळ्या समुद्रावरून उडणारे अनेक ड्रोनही पाडण्यात आले. मॉस्कोच्या दिशेने येणारे अंदाजे 450 ड्रोन हवेतच रोखण्यात आल्याचे महापौर सोब्यानिन यांनी सांगितले.

निवडणुकीच्या धामधुमीत हल्ल्यांचे सत्र

हा हल्ला संसदीय निवडणूक प्रक्रियेत अडथळा आणण्याचा प्रयत्न होता, असा आरोप रशियाने केला आहे. फेब्रुवारी 2022 मध्ये रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यापासून रशियामध्ये झालेली ही पहिली युद्धकालीन संसदीय निवडणूक आहे. राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनीही युक्रेनवर निवडणुकीदरम्यान हस्तक्षेप आणि अडथळा आणल्याचा आरोप केला आहे.

Advertisement
Tags :

.