For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

फलक काढण्यासाठी आलेल्यांना दाखविला मराठी हिसका

06:47 AM Nov 01, 2026 IST | Tarun Bharat Portal
फलक काढण्यासाठी आलेल्यांना दाखविला मराठी हिसका
Advertisement

म. ए. समितीच्या कार्यालयावरील फलक हटविण्याचा प्रयत्न : कार्यकर्त्यांनी हुसकावून माघारी धाडले

Advertisement

त. भा. प्रतिनिधी/ बेळगाव

सीमावासियांच्या सर्वोच्च समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यालयावरील फलक काढण्यासाठी महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी हात घातल्याचा प्रकार शनिवारी सायंकाळी घडला. या घडलेल्या प्रकारानंतर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार विरोध करत कर्मचाऱ्यांना हुसकावून लावले. यामुळे या परिसरात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला.

Advertisement

कर्नाटक राज्योत्सव दिनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील मराठी फलकांना लक्ष्य करण्यात आले. रामलिंगखिंड गल्ली येथील रंगुबाई भोसले पॅलेस येथे असलेला शहर महाराष्ट्र एकीकरण समितीचा फलक काढण्याचा प्रकार घडला. यापूर्वी मराठी व्यापारी, विक्रेते, व्यावसायिक यांना त्रास दिला जात होता. परंतु आता महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यालयालाच लक्ष्य केले जात असल्याने तीव्र विरोध होऊ लागला आहे.

महापालिकेच्या या कारभारामुळे सीमाभागातील भाषिकवाद पुन्हा उफाळून येण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मनपा कर्मचाऱ्यांना जोरदार विरोध केला. ही माहिती समजताच शहरातील प्रमुख कार्यकर्त्यांनी रंगुबाई भोसले पॅलेस येथील कार्यालयाकडे धाव घेतली. यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

यापूर्वी प्रकाश शिरोळकर यांच्या वाहनावरील मराठी भाषेतील नामफलक हटविण्याचा प्रयत्न झाला होता. त्यावेळी शिवसैनिकांनी चांगलाच चोप दिला होता. त्यानंतर या परिसरात कन्नड संघटना कधी फिरकल्या नव्हत्या. आता प्रशासनावर दबाव टाकून मराठी फलक हटविण्यासाठीचे प्रयत्न सुरू आहेत. परंतु हा प्रयत्न मराठी भाषिकांनी पुन्हा एकदा हाणून पाडला आहे.

Advertisement
Tags :

.